Pollution Deaths: थंडीची चाहूल लागताच प्रदूषणाची (Pollution) पातळीही हळूहळू वाढू लागली आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांची हवा सतत प्रदूषित होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दरवर्षी सरकारकडून विविध पावलं उचलली जातात, मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. राजधानी दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांची हवा येत्या काळात आणखी प्रदूषित होऊ शकते. प्रदूषण हे मानवासाठी एखाद्या रोगाच्या प्रसाराइतकंच घातक आहे. प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो.


प्रदूषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू


लॅन्सेटच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 90 लाखांपर्यंत पोहोचली आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सतत वाढत आहे. प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि ते इतरांपेक्षा लवकर मरतात. जगभरातील 16 टक्के लोकांचा अकाली मृत्यू प्रदूषणामुळे होतो.


प्रदूषण सर्वांसाठीच धोकादायक


एचआयव्ही आणि मलेरियासारख्या प्राणघातक आजारांपेक्षा प्रदूषण अधिक घातक बनलं आहे. प्रदूषणाचा मानवाव्यतिरिक्त पक्षी आणि समुद्री जीवांवरही परिणाम होतो. दरवर्षी प्रदूषणामुळे हजारो जीवांचाही मृत्यू होतो. दरवर्षी प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत विविध प्रकारचे अहवाल येत राहतात, मात्र त्यातील मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी ते झपाट्याने वाढत आहेत.


भारतात प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील काही शहरांचा समावेश जगातील सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत केला गेला आहे. राजधानी दिल्ली देखील जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे.


दिल्ली-एनसीआरमध्ये हे निर्बंध लागू


वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत GRAP स्टेज 2 चे निर्बंध लागू आहेत. याअंतर्गत दररोज रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. तर पाणी फवारणी दर दुसऱ्या दिवशी केली जाणार आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कोळसा किंवा तंदूर वापरला जाणार नाही. रुग्णालयं, रेल्वे सेवा, मेट्रो सेवा यांसारखी ठिकाणं वगळता अन्यत्र डिझेल जनरेटरचा वापर केला जाणार नाही. लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पार्किंग शुल्क वाढवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक किंवा सीएनजी बस आणि मेट्रो सेवांची वारंवारिता वाढवण्यात येणार आहे.


मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब


देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत दिवसेंदिवस राजधानी दिल्लीला मागे टाकत आहे. मुंबई दिल्लीला मागे टाकत सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 113 वर होता. त्यानंतर तो 20 ऑक्टोबरला सकाळी ते 161 पर्यंत वाढला, त्यावेळी दिल्लीचा  AQI 117 होता. म्हणजेच प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकलं आहे.


0 ते 50 मधील AQI 'चांगला' आहे, 51 ते 100 'समाधानकारक' आहे, 101 ते 200 'मध्यम' आहे, 201 ते 300 'खराब' आहे, 301 ते 400 'अतिशय वाईट' आहे आणि 401 ते 500 ​​मधील AQI 'गंभीर' मानला जातो.


हेही वाचा:


Jews Population: बाकी धर्मांप्रमाणे का नाही वाढली ज्यूंची लोकसंख्या? 'हे' आहे कारण