Pakistan Flood Viral Video : पाकिस्तानमध्ये (Pakistan) महाप्रलय आलं आहे. भारताशेजारील देश पाकिस्तानला महापुराचा फटका (Pakistan Flood) बसला आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरात आतापर्यंत हजारहून अधिक नागरिकांसाह शेकडो जनावरांच्या मृत्यू झाला आहे. पाकिस्तान सरकारने पुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणीही लागू केली आहे. दरम्यान आता पुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पत्रकार पुराच्या पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून पूरस्थितीचं वार्तांकन  (Flood In Pakistan) करताना दिसत आहे. रिपोर्टरच्या वार्तांकनाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. 


पाकिस्तानमधील महापुराचं रिपोर्टींग करतानाचा एका रिपोर्टरचा व्हिडीओ सध्या जगभरात जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रिपोर्टर पुराच्या पाण्यामध्ये उतरून जीव धोक्यात घालून वार्तांकन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, हा पत्रकार मानेपर्यंत खोल असलेल्या पाण्यात उतरून कसातरी माईक सांभाळत रिपोर्टींग करत आहे. पण विशेष म्हणजे एवढ्या खोल पाण्यात जीव धोक्यात घालूनही या पत्रकाराने हातातील माईक काही सोडलेला नाही.


पाकिस्तानी मीडिया किंवा पत्रकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. याआधीही रिपोर्टींगचे अनेक मजेदार व्हिडीओ समोर आले आहेत. तर वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रातील भांडणाचे व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी पत्रकाराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. थेट महापुरातून या पत्रकारानं महाकव्हरेज केलं आहे. 






मानेपर्यंतच्या पाण्यामध्ये लाईव्ह रिपोर्टींग


पाकिस्तानी पत्रकाराचा मानेपर्यंत उंच पाण्यातील लाईव्ह रिपोर्टींगचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. खोल पाण्यात माईक सांभाळत पत्रकारानं केलेली लाईव्ह रिपोर्टींग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हायरल व्हिडीओ अनुराग अमिताभ (Anurag Amitabh) नावाच्या युजरने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.   


पाकिस्तानमध्ये आतापर्यंतचा सर्वात भीषण पूर


पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस सुरुच आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (National Disaster Management) विभागाच्या माहितीनुसार, देशात 14 जूननंतर सिंध प्रांतामध्ये पुरामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच कराची, पंजाब आणि बलूचिस्तानमध्येही परिस्थिती फारच वाईट आहे. पाकिस्तीनी मीडिया रिपोर्टनुसार, देशातील 70 टक्के भागाला पुराचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिंध प्रांतावर झाला आहे. या महाप्रलयामुळे सुमारे तील कोटी लोकांचे संसार वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, महापुरामध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.