Theatre Advertisements: तुम्ही एखादा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलात तर सिनेमा सुरू होण्याआधी आधी राष्ट्रगीत होते, त्यानंतर काही वेळ जाहीराती दाखवल्या जातात. त्यानंतर चित्रपट सुरू होतो. अनेकांना त्या जाहीराती आवडत नाहीत म्हणून काहीजण जाणून बुजून थोडं उशिरा जाणं पसंत करतात. समजा तुम्ही चित्रपटाचे तिकीट घेतले आहे. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत सिनेमागृहात वेळेवर पोहोचता, पण काय... सिनेमा सुरू होण्यापूर्वी तुम्हाला जाहिरातींच्या नंतर जाहिराती दाखवल्या जातात आणि ठरलेल्या वेळेनंतरही जवळपास 25 ते 30 मिनिटे सिनेमा सुरू होत नाही. हे जवळपास प्रत्येक सिनेमागृहात घडते. चित्रपटगृह मालकांनी वेळेच्या तिकिटावर (चित्रपट सुरू होण्याची वेळ) दिलेल्या वेळेत चित्रपट सुरू होत नाही आणि प्रेक्षकांना जाहिराती पहाव्याच लागतात.असेच एक प्रकरण नुकतेच न्यायालयात पोहोचले असून त्यावर न्यायालयाने पीव्हीआर आयनॉक्सला फटकारले आहे. त्याचबरोबर त्यांना दंडही ठोठावला आहे. सिनेमा हॉल किती वेळ जाहिराती दाखवू शकतात याचे काय नियम आहेत आणि जर तुमच्यासोबतही असे घडले तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता ते जाणून घ्या सविस्तर.

प्रथम जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बेंगळुरूचे रहिवासी असलेले अभिषेक एमआर यांनी पीव्हीआर, आयनॉक्स आणि बुक माय शोच्या विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. चित्रपटगृहात चित्रपटापूर्वी 25 ते 30 मिनिटे जाहिराती दाखवून आपला वेळ वाया घालवला, त्यामुळे मानसिक त्रास झाला, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी न्यायालयाने सिनेमागृहाला फटकारले असून, मानसिक त्रास आणि गैरसोयीसाठी तक्रारदाराला 20 हजार रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून 8 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय ग्राहक कल्याण निधीमध्ये एक लाख रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जाहिराती दाखवण्याचे नियम काय आहेत?

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पीव्हीआरच्यावतीने अनेक युक्तिवाद करण्यात आले. पीव्हीआरने सांगितले की, चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवलेल्या जाहिरातीत सार्वजनिक सेवा घोषणांचा समावेश होता. मात्र, चित्रपटगृहांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक सेवा घोषणा आणि कल्याणकारी योजनांच्या जाहिराती केवळ 10 मिनिटांत दाखवता येतील, असे ग्राहक न्यायालयाने या प्रकरणी स्पष्ट केलं आहे. चित्रपटाच्या आधी दाखवलेल्या जाहिराती मध्यंतरात दाखवल्या जाऊ शकतात, जेणेकरून चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांचा वेळ वाया जाऊ नये. अशा परिस्थितीत अशा अनावश्यक जाहिरातींविरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याचा अधिकार दर्शकांना आहे.