Indian Railways: लांबच्या असोल किंवा जवळच्या प्रवासासाठी लोक भारतीय रेल्वेला पहिलं प्राधान्य देतात. मग ते जनरल डब्यातून असो किंवा एसी डब्यांसाठी. आरामदायी प्रवासासोबतच रेल्वे प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधाही पुरवते. तुम्ही एसी कोचने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेकडून बेड रोल दिला जातो. यामध्ये प्रवाशांना दोन चादरी, एक ब्लॅंकेट आणि उशी दिली जाते. मात्र, रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या या सुविधा प्रवाशांना आवडत असल्याने कधी कधी तर या वस्तूंची चोरी होते.

अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी प्रवासाच्या दरम्यान मिळालेली बेडशीट, ब्लँकेट आणि उशी सोबत घेऊन जातात. या चोरीचा फटका रेल्वे कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आणि त्यांच्या पगारातून अनेकदा पैसे कापले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? की, जर तुम्ही बेड रोलच्या वस्तू चोरल्या तर त्याची किंमत चोरणाऱ्याला त्या वस्तुच्या किमतीपेक्षा जरा जास्तच महागात पडू शकते आणि यामध्ये दंडासह शिक्षेचीही तरतूद आहे.

वस्तू कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्याव्या लागतात

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर आरामदायी प्रवासासाठी तुम्हाला एसी कोचमध्ये बेड रोल दिला जातो. प्रवास संपल्यानंतर हे सामान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्याची किंवा त्याच्या सीटवर सुरक्षितपणे ठेवण्याची जबाबदारी प्रवाशाची असते.अनेक वेळा प्रवासी हे सामान सोबत घेऊन जातात. 2017-18 च्या अहवालानुसार, पश्चिम रेल्वेमधून 1.95 लाख टॉवेल, 81,736 बेडशीट, 5,038 उशा, 55,573 पिलो कव्हर आणि 7043 ब्लँकेट चोरीला गेले आहेत.

ही शिक्षा मिळू शकते 

ट्रेनमध्ये प्रवास करताना बेडशीट, उशी किंवा ब्लँकेट चोरल्यास आणि तुमच्यासोबत चुकून नेले असल्यास, रेल्वे तुमच्यावरही कारवाई करू शकते. रेल्वे मालमत्ता अधिनियम, 1966 नुसार, चोरीच्या मालासह प्रथमच पकडले गेल्यास, एक वर्षाचा तुरुंगवास किंवा 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. प्रकरण गंभीर असल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.