मुंबई: महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे, तर येड्यांचं सरकार असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. बेरोजगारांना नोकरी देण्यापेक्षा बेरोजगारांचे खिसे कापण्यावर सरकारचा जास्त जोर असल्याचं पटोले म्हणाले. दोन हजार जगांसाठी 15-15 लाख अर्ज येतात आणि त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो आणि अशा प्रकारे अरबो रुपये जमा केले जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला.
'बेरोजगार युवकांचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण'
परीक्षा घेणारी प्रायव्हेट कंपनीत सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा वाटा आहे का? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. कधी पेपरफुटी, तर कधी सर्व्हर डाऊन दाखवलं जातं आणि यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सरकारकडून केलं जात असल्याचा घणाघाती आरोप देखील नाना पटोलेंनी केला. त्याचाच परिणाम आज तलाठी भरतीच्या परीक्षेत बघायला मिळत असल्याचंही पटोले म्हणाले. हे तरुणांच्या विरोधातील सरकार असून मुद्दाम हे येड्यांचं सरकार पाप करत असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी तलाठी परीक्षेच्या सर्व्हर डाऊनबाबत बोलताना केली.
कांद्याच्या मुद्द्यावरुन पटोलेंकडून मोदी सरकारचा निषेध
भाजप हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असं पटोले म्हणाले. नाना पटोलेंनी सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेल्या 40 टक्के वाढीबाबत भाजपवर टीका केली. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो, त्यावेळेस केंद्र सरकार मुद्दाम असे प्रकार करत असल्याचं दिसून येत असल्याचं नाना पटोले म्हणाले. शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात निघाला असून त्याला विदेशातही मोठी मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारनं निर्यातीवर शुल्क वाढवून एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला असून याबाबत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करतो, असं पटोले म्हणाले.
'ऐश्वर्या रायचे डोळे बघण्यापेक्षा मंत्री गावितांनी गरीब, शेतकऱ्यांकडे बघावं'
ऐश्वर्या रायचं उदाहरण देत, मासे खाल्ल्याने स्त्रियांचं सौंदर्य खुलतं, तसेच डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात, असा जावईशोध विजयकुमार गावित यांनी लावला, यावर पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात शेतकरी आणि बेरोजगारांचा विषय गंभीर असताना गावितनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ऐश्वर्या रायचे डोळे बघण्यापेक्षा मंत्री गावितांनी गरीब आणि शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं म्हणत नाना पटोलेंनी विजयकुमार गावितांना चिमटा काढला. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित स्वतः मासे खातात का हे पाहून आणि त्यांचे डोळे तपासावे लागतील, असंही पटोले म्हणाले.
प्रतापराव जाधव यांनी भाजपचा राग काँग्रेसवर काढू नये - पटोले
काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवार यांना मोठी जबाबदारी दिली असून ते ती योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करत आहे आणि हे दुखणं भाजपला असल्याचं पटोले म्हणाले. प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसवर टिप्पणी करताना वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीनंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची टीका केली होती, त्यावर नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं आहे.
... तरच बाळासाहेब आंबेडकरांचा विचार केला जाईल, पटोलेंची स्पष्ट भूमिका
बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या अलायन्समध्ये नाहीत. अलायन्समध्ये राहिले असते तर त्यांचा आम्ही विचार केला असता, अशी स्पष्टोक्ती नाना पटोले यांनी आंबेडकर यांच्याबाबत केली. भाजप विरोधकांची, म्हणजेच इंडियाची मुंबई बैठक होत असून बैठकीचं निमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना मिळालं नसल्यानं आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली, यावर नाना पटोलेंनी आपलं मत मांडलं.
महाराष्ट्र काँग्रेसवर ठेवलेला विश्वास पूर्णत्वाला नेऊ - पटोले
काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रवर मोठा विश्वास ठेवलेला आहे. महाराष्ट्रातून दिल्लीला जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजे, याविषयी मोठी जबाबदारी आमच्यावर आलेली असल्याचं पटोले म्हणाले. यावेळी राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार नाना पटोलेंनी व्यक्त केले.
हेही वाचा: