Kerala Transgender Couple Pregnancy : सध्या भारतातील एक ट्रान्सजेंडर जोडपं चर्चेत आलं आहे. केरळमधील एका ट्रान्सजेंडर जोडप्याने 'गूड न्यूज' दिली आहे. या जोडप्याच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. या ट्रान्स कपलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. केरळच्या कोझिकोडमधील ट्रान्सजेंडर जोडपं आई-बाबा होणार आहे. मार्च महिन्यामध्ये त्यांचं पहिलं बाळ जन्माला येईल. जिया आणि जिहाद यांनी इंस्टाग्रामवर प्रेगनेंसीचे फोटो शेअर केले आहेत. 


ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली 'गूड न्यूज'


जिया आणि जिहाद तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये असून एकमेकांसोबत राहतात. जियाने तिच्या इंस्टाग्रामवर प्रेगनेंसीचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे की, 'मी जन्मापासूनच महिला नाही. पण आई होण्याचं स्वप्न मी पाहिलं आहे. एखाद्या मुलाने मला आई म्हणून हाक मारावी अशी माझी नेहमीच इच्छा होती. तीन वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आता माझं आई होण्याचं आणि जिहादचं बाबा होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जिहादच्या पोटात आमचं आठ महिन्यांचं बाळ आहे.'




स्त्रीचा पुरुष झाल्यावर झाली गर्भधारणा


रिपोर्टनुसार, या ट्रान्सजेंडर जोडप्याने गर्भधारणेसाठी शस्त्रक्रियेची मदत घेतली आहे. जिया जन्मापासून महिला नव्हती. मुलाच्या रुपात जन्म घेतलेल्या जियाची महिलेप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा होती. तर जहादचा जन्म मुलीच्या रुपात झाला पण, त्याची इच्छा मुलाप्रमाणे आयुष्य जगण्याची होती. जिया आणि जिहाद यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. 


लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर जिया पुरुषाची महिला झाली आणि जिहाद महिलेचा पुरुष. दरम्यान, लिंग बदल करताना जिहादच्या शरीरात असणारे गर्भाशय आणि महिलांमध्ये असणारे काही अवयव शरीराबाहेर काढण्यात आले नव्हते. यामुळेच शस्त्रक्रियेच्या मदतीने जिहादला पुरुष झाल्यानंतरही गर्भधारण करता आलं.