पुणे : पावसाळ्यामुळे हवामान सातत्याने बदलत असल्याने हवाई वाहतुकीवर याचा परिणाम होतो. यापूर्वीही अनेकदा हवामान खराबीमुळे हवाई वाहतूक अचानक बदलण्यात आली किंवा इमर्जन्सी लँडींग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील पौडजवळ आज हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप बचावले आहेत. या दुर्घटनेत पायलट जखमी झाल्याची माहिती असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगावधान दाखवत येथील एका शेतात ते उतरवण्याचा प्रयत्न केल्याने इमर्जन्सी लँडींग शक्य झाले, पण ते हेलिकॉप्टर क्रॅश होऊन शेतात कोसळले. देव तारी, त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्ययचं या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून आला आहे. कारण, बघता बघता एका क्षणात हे हेलिकॉप्टर खाली कोसळले आणि त्याचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र, सुदैवाने सर्वच प्रवासी बचावले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सर्वच प्रवासी बचावल्याने नेटीझन्सकडून समाधान व्यक्त होत आहे.


पुणे (pune) जिल्ह्यातील पौडजवळ हे हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झाले असून मुंबईहून हैदराबादच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. त्यामधून पायलटसह 4 प्रवासी प्रवास करत होते, पौड जवळच्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, बचाव यंत्रणा देखील घटनास्थळी पोहोचल्या असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.