Dancing Plague : जगभरात आतापर्यंत अनेक महामारीचा प्रकोप (Epidemic) पाहायला मिळाला आहे. इतिहासात अशा घटनांची नोंद आहे, ज्यामध्ये महामारी पसरल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता. जग सध्या कोरोना (Coronavirus) महामारीतून अद्यापही सावरत आहे. यामुळे जगभरात लाखो रुग्णांनी प्राण गमावले आहेत. 500 वर्षापूर्वीही अशीच एक महामारी पसरली होती, ज्यामुळे शेकडो लोकांचा बळी गेला होता. धक्कादायक बाब म्हणजे या महामारीमुळे नाचता-नाचता लोकांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण नेमकं काय आहे, हे सविस्तर जाणून घ्या.


नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू


हो तुम्ही वाचताय ते खरं आहे, या महामारीमुळे नाचता-नाचता लोकांचा मृत्यू झाला होता. 1518 मध्ये, अल्सेसच्या स्ट्रासबर्गमध्ये अशीच एक महामारी होती, ज्याला आपण आता फ्रान्स म्हणून ओळखतो, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. 500 वर्षांपूर्वी आय डान्सच्या महामारीने फ्रान्समध्ये अनेकांचा बळी घेतला होता. या महामारीमुळे सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला.


नेमकं काय घडलं?


जुलै 1518 मध्ये एका तरुणीने अचानक नाचायला सुरुवात केली आणि नाचत असताना तिचे भान हरपलं. फ्राऊ ट्रॉफीया नावाची 34 तरुणी नाचण्यात इतकी मग्न झाली की, ती घराबाहेर नाचत रस्त्यावर आली.  14 जुलै 1518 रोजी फ्राऊ ट्रॉफीया (Frau Troffea) पहिल्यांदा घराबाहेर पडून रस्त्यावर नाचू लागली. तिला नाचताना पाहून लोकांना आश्चर्य वाटलं, कारण ती नाचताना कोणत्याही प्रकारचं गाणं किंवा संगीत सुरु नव्हतं. तरीही ती बेभाग होऊन नाचत होती.यावेळी तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. अनेकांना वाटलं की, तरुणीला वेड लागलं आहे. तिचा पती आणि कुटुंबीयांना वाटलं की, ती नशेत आहे. नाचता ती थकली आणि बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर तिचा पती तिला उचलून घरी घेऊन गेला. 


अचानक नाचायला सुरुवात, थांबण्याचं नाव नाही


दुसऱ्या दिवशीही फ्राऊ सकाळी उठताच काही न खाता-पिता पुन्हा नाचू लागली. दोन-तीन दिवस सलग असाच प्रकार सुरु होता. फ्राऊ फक्त नाचत होती. ती काही खात-पित नव्हती. डॉक्टरांनाही हा प्रकार समजत नव्हता. तोपर्यंत शहरात अनेक जण अशाच प्रकारे नाचत असल्याचं समोर आलं. ऑगस्ट महिन्यापर्यंत नाचणाऱ्यांची संख्या 100 पर्यंत पोहोचली. लोक अचानक नाचणं सुरु करत होते. पण, थांबण्याचं नाव घेत नव्हते. 


डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय?


लोक अचानक नाचू लागतं आणि थांबत नव्हते. यामुळे अखेर त्यांचं शरीर काम करणं बंद करत होतं. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी फ्रान्समध्ये पसरली. यानंतरही अशा प्रकारे नाचता-नाचता लोकांचा मृत्यू होण्याच्या घटना सुरुच होत्या. अशाप्रकारे नाचता-नाचता मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस होती. या रोगाला डान्सिंग प्लेग असं नाव देण्यात आलं.


डॉक्टरांचे वेगवेगळे सिद्धांत


आता फ्रान्समध्ये अनेक भागात लोक नाचू लागले. लोकांची नाचण्याची क्रिया थांबत नव्हती. यानंतर पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे 15 जणांचा मृत्यू झाला, तेव्हा प्रशासनाने गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला डॉक्टरांना असे वाटले की, हा एक प्रकारचा नैसर्गिक आजार आहे. शरीरातील रक्ताचे तापमान वाढल्यामुळे हे घडत आहे. काही डॉक्टरांनी याचे वेगवेगळे सिद्धांत मांडायला सुरुवात केली. पण नाचणाऱ्यांची संख्या एवढी वाढत होती की, प्रत्येकाला बरे करणं फार कठीण झालं होतं, कारण यामागचं मूळ कारण सापडत नव्हतं.


मृत्यूचं नेमकं कारण काय? 


मीडिया रिपोर्टनुसार, फ्रान्समध्ये त्यावेळी या विचित्र 'डान्सिंग प्लेग' आजारामुळे सुमारे 400 जणांचा मृत्यू झाला होता. आजही अनेक शास्त्रज्ञांमध्ये लोकांचा मृत्यू नाचण्यामुळे झाला की, नाही यावर मतभेद आहेत. या रहस्यमय घटनेला शास्त्रज्ञांनी 'डान्सिंग प्लेग' असं नाव दिलं होतं. या घटनेचं गूढ आजतागायत कायम असून याच्या रहस्यावरून आजपर्यंत पडदा उचलला गेलेला नाही. अजूनही शास्त्रज्ञ त्या घटनेवर संशोधन करत आहेत. 'डान्सिंग प्लेग' आणि मृत्यू याबाबत वैज्ञानिकांनी वेगवेगळी मतं मांडली आहेत. पण हा रोग नेमका कुठून आला आणि कसा संक्रमित झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.