Boxing Day 2023: आज जगभरातील बहुतांश देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जात आहे. हा दिवस पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषतः यूकेमध्ये साजरा केला जातो. दरवर्षी ख्रिसमस म्हणजेच 25 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. 'बॉक्सिंग डे' (Boxing Day)  हे नाव ऐकल्यानंतर जर तुम्ही त्याचा संबंध बॉक्सिंग खेळाशी जोडण्याचा प्रयत्न करत असाल तर, असं अजिबात नाही आहे. बॉक्सिंग डेचा (Boxing Day) बॉक्सिंगशी काहीही संबंध नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये हा दिवस एक प्रकारची सुट्टी आहे, जो ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड, आयर्लंड, कॅनडा इत्यादी ब्रिटिश कॉमनवेल्थ देशांमध्ये साजरा केला जातो. ही एक ब्रिटीश प्रथा आहे, जी नंतर इतर अनेक देशांमध्ये देखील लागू झाली. हा दिवस बँक किंवा सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाच्या इतिहासाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...


What is Boxing Day? काय आहे बॉक्सिंग डे 


या दिवसाचा कोणत्याही खेळाशी काहीही संबंध नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये या दिवसाची सुरुवात गरजूंना दान देण्याच्या प्रथेने झाली. जुन्या काळात लोक या दिवशी बॉक्स भरून गरिबांना भेटवस्तू देत असत. मात्र बदलत्या काळानुसार हा दिवस साजरा करण्याचा उद्देशही खूप बदलला आहे. दरवर्षी ख्रिसमसनंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या या खास प्रसंगी लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतात. सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी लोक कुटुंबासह खरेदीसाठी जातात.


Why is Boxing Day celebrated? का साजरा केला जातो बॉक्सिंग डे?


गेल्या अनेक वर्षांपासून हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश कुटुंबासोबत वेळ घालवणे हा आहे. या दिवशी यूके आणि आयर्लंडमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. पूर्वीच्या काळी लोक या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत असत आणि ख्रिसमसच्या आदल्या दिवशी त्यांना सुट्टी देत ​​असत, जेणेकरून ते आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकतील. सध्या जर्मनी, हंगेरी, नेदरलँड आणि पोलंड या युरोपातील अनेक देशांमध्ये हा दिवस (Boxing Day) दुसरा ख्रिसमस डे म्हणून साजरा करतात. दरम्यान, या दिवशी लोक फुटबॉलचे सामने पाहायला जातात. यूकेमध्ये ही खूप जुनी परंपरा आहे. तसेच अनेक लोक या दिवशी मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात. कारण या खास दिवशी अनेक कंपन्या लोकांना खूप ऑफर्स देतात. बॉक्सिंग डे (Boxing Day) ख्रिसमस बॉक्सच्या नावावरून या दिवसाला नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत गरजूंना पैसे, अन्न आणि भेटवस्तू दिल्या जातात.