Actual Price Of Water Bottle : देशात गेल्या 20 ते 30 वर्षांत बाटलीबंद पाण्याची (Packaged Drinking Water) मागणी वाढली आहे. घराबाहेर असताना आपल्याला तहान लागली तर, आपण बाटलीबंद पाणी विकत घेऊन पितो. बाटली बंद पाणी शुद्ध असतं, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे घराबाहेर असताना लोक सर्रास बाटलीबंद पाणी (Packaged Water) विकत घेऊन पितात. साधारणपणे बाटलीबंद पाण्याची किंमत जवळपास 20 रुपये असते. नळाला येणाऱ्या पाण्याची किमतीपेक्षा ही किंमत 10,000 पटीनं जास्त आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. तुम्ही विकत घेणाऱ्या 20 रुपयांच्या बाटलीची मूळ किंमत जाणून घ्या.


बाजारात अनेक प्रकारे प्रोसेस केलेलं पाणी बाटली बंद स्वरुपात मिळतं. बाटलीबंद पाणी तीन गटात वर्गीकृत केलं जातं. 


1. प्यूरिफाइड वॉटर 


शुद्ध केलेले पाणी (Purified Water) नळाचं पाणी असतं, जे अनेक प्रक्रियांद्वारे शुद्ध केलं जातं. यामध्ये कार्बन फिल्टरेशन आणि रिव्हर्स ऑस्मोसिस सारख्या तंत्रांचा समावेश आहे. या प्रक्रियेत पाण्यातील अनेक खनिजं नष्ट होतात.


2. डिस्टिल्ड वॉटर 


या प्रकारच्या पाण्यातून बहुतेक खनिजे काढून टाकली जातात. हे लहान उपकरणांमध्ये वापरण्यासाठी चांगलं मानलं जातं.


3. स्प्रिंग वॉटर


पाणी प्रक्रिया केलेलं असो किंवा प्रक्रिया न केलेलं असो, कोणत्याही प्रकारचं पाणी स्प्रिंग वॉटर श्रेणीत येतं. नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स काउन्सिलच्या मते, त्यात खनिजांची कमतरता आणि इतर अनेक सामान्य समस्या असू शकतात. शुद्ध आणि डिस्टिल्ड पाणी ऐकल्यानंतर, आपण असं गृहीत धरू शकतो की, हे पाणी सर्वात आरोग्यदायी आणि शुद्ध आहे, पण हे नेहमीच खरं नसतं.


नळाच्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाणी किती महाग असतं?


बाटलीबंद पाणी सुरक्षित असतं, असा अनेकांचा समज आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे बाटलीबंद पाणी आपण विकत घेतो. त्यामुळे हे नळाच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आणि आरोग्यदायी असतं, असं अनेकांना वाटतं. यामुळे अलिकडच्या काळात बाटलीबंद पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे बाटलीबंद पाण्यांमध्येही भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. नफा कमवण्यासाठी काही जण नळाचं पाणी बॉटलमध्ये भरून ते तसंच प्रक्रिया न करता त्याची विक्री करतात आणि या भेसळीतून पैसे कमावतात.


आपल्याला नळाचं पाणी मोफत मिळतं, तर आपण बाटलीबंद पाणी विकत घेतो. बाटलीबंद पाण्यासाठी आपण खूप जास्त किंमत मोजत आहोत, हे तुम्हाला माहित नसेल. वेगवेगळ्या वॉटर ब्रँडच्या किमती बदलतात. देशात साधारणपणे एका लिटर बाटलीबंद पाण्याची किंमत सुमारे 20 रुपये आहे. नळातून मिळणाऱ्या पाण्यापेक्षा हे 10,000 पट जास्त महाग आहे.


बाटलीबंद पाण्याची मूळ किंमत किती?


द अटलांटिकचे बिझनेस एडिटर आणि अर्थशास्त्रज्ञ डेरेक थॉम्पसन यांच्या मते, आपण स्वयंपाक करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी आणि आंघोळ या कामासाठी जे पाणी वापरतो, त्यापेक्षा बाटलीबंद अर्धा लिटर पाण्याची किंमत जास्त आहे. यामागचं गणित कसं आहे जाणून घ्या.


प्लास्टिकच्या बाटलीची किंमत साधारणपणे 80 पैसे, एक लिटर पाण्याची किंमत 1.2 रुपये, विविध प्रक्रिया करण्यासाठी एका बाटलीवर सुमारे 3.40 रुपये खर्च येतो. याशिवाय अतिरिक्त खर्च म्हणून 1 रुपये खर्च केले जातात. अशा प्रकारे बाटलीबंद पाण्याच्या एका बाटलीची एकूण किंमत 6.40 पैसे आहे. साधारणपणे 7 रुपये मूळ किंमत असलेल्या पाण्यासाठी आपण 20 रुपये किंवा त्याहूनही अधिक खर्च करतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Space : पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर अंतराळात आहे एका व्यक्तीची कबर, 'ती' व्यक्ती कोण आणि याचं कारण काय?