चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचे (Tiger Attack) सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. वाघाच्या हल्ल्याच्या दोन 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारुती शेंडे (वय 63) हे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला असता वाघाने अचानक हल्ला केला. ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भादूर्णी गावातील ऋषी पेंदोर हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात बळी पडला आहे. दोन्ही घटनास्थळी वनपथक दाखल झाले असून पुढील कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे.


मात्र एकट्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याचे घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 


एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात 8 जणांचा मृत्यू


चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील भादूरणा येथे 12 मे रोजी तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भूमिका दीपक भेंदारे (28) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. त्या आपल्या पती आणि गावातील इतर लोकांसोबत सकाळी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. अशातच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. तर 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या 3 महिलांचा तर  11 मे रोजी मूल तालुक्यातील महादवाडी येथे एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. परिणामी, वाघाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये  गेल्या 8 दिवसात 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशातच आता पुन्हा एकदा वाघाची दहशत बघायला मिळली असून वन्यजीव आणि मानुष्याच्या संघर्षात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. 


कामावरील मजुरांवर मधमाशांच्या हल्ला


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या गाळ काढण्याच्या कामावरील कामगारांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेत आठ कामगार जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील चन्नाधानला इथं घडली. एका झाडाखाली मजुरांनं कचरा पेटविला. आगीच्या ज्वाळा मधमाशांच्या पोळ्याला लागल्यानं मधमाशांनी हा हल्ला केला. 


इतर महत्वाच्या बातम्या