नागपूर : 'तू हॉं कर या ना कर'   पण मी तर छेडतच राहणार अशा मजनूंना चांगला दणका देणारा आदेश हायकोर्टाने दिला आहे.  लग्न झालेल्या स्त्रीला प्रेम पत्र फेकून मारणे हा विनयभंगच असा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.  एका प्रकरणात सुनावणीच्या वेळेस मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर बेंचने हे निरीक्षण केले आहे. 


जस्टीस रोहित देव हे  2011 मधील अकोल्यातील प्रकरणाची सुनावणी करत होते.  या प्रकरणात आरोपी श्रीकृष्ण टावरी याने लग्न झालेली तक्रारकरती स्त्री घरकाम करत असताना तिच्या जवळ येऊन तिला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. महिलेने चिठ्ठी घेण्यास नकार दिला तेव्हा त्याने 'आय लव्ह यु' म्हणत ती चिट्ठी तिच्या अंगावर भिरकावली. तसेच दुसऱ्या दिवशी त्या महिलेला परत येऊन अश्लील हातवारे करत कोणाला ही सांगू नये अशी धमकी हि दिली. तसेच त्याने अनेक वेळा आधी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असून तिला छोटे छोटे दगड मारून तिच्याबरोबर बोलण्याचाही प्रयत्न केल्याची तक्रार महिलेने दिली होती. या प्रकरणात सेशन्स कोर्टाने आरोपीला 40,000 रुपये दंड आणि दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती. या विरोधात आरोपी हायकोर्टात गेला होता.          


काय म्हणणे आहे हायकोर्टाचे? 


तक्रारदार महिलेचे लग्न झाले  असून वय 45 वर्ष आहे. त्यांच्यावर चिठ्ठी फेकणे ज्यात तिच्यावर असलेले प्रेम व्यक्त केले आहे आणि ज्यात कविता लिहिल्या आहेत .... ही कृतीच विनयभंग केल्याची आहे.  महिलेचे शील हा तिचा सर्वात मौल्यवान दागिना असतो आणि असा कुठला ही सरळ फॉर्म्युला नाही ज्याने तिचा विनयभंग झाला का हे ठरवता येईल. मला आरोपीने तिच्यावर आक्षेपार्ह मजकूर असणारी चिट्ठी फेकली यावर अविश्वास दाखवण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे तिचा विनयभंग झाला या निर्णयाशी संमत आहे. 


 हायकोर्टाने मात्र आरोपीला 45 दिवसाच्या करावासानंतर अजून बंदीगृहाची गरज नसून त्याला देखील सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे असे देखील नमूद केले. मात्र दंड हा 50,000 रु. नी वाढवून तो रुपये 90,000 करत तो तक्रार करणाऱ्या  महिलेला द्यावा असे निर्देश केले.