सातारा : साताऱ्यातील फलटण परिसरात आगळी वेगळी चोरी पाहायला मिळाली आहे. या चोरीत चोरट्यांनी इतिहासच घडवला, असं म्हणायला काही हरकत नाही. कोरोनाबाधित एखादा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तो संपूर्ण परिसर सील करतात. मात्र या अशाच परिसरातील सामसुमिचा फायदा उचलत चोरट्यांनी मध्यरात्रीत चक्क पीपीई किट घालून चोरी केल्याच दिसून येत आहे.
रविवार पेठेतील हिराचंद कांतीलाल ज्वेलर्स या दुकानाची भिंत फोडून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी दुकानातील शोकेसमध्ये लावलेले दागिने आणि आतील कपाटात असलेली दागिने असे सुमारे 78 तोळे सोने लंपास केले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी कोरोनाबाधित रुग्णांना बरे करणारे डॉक्टर ज्या पद्धतीने संपूर्ण शरीर झाकतात त्या पद्धतीने त्यांनी डोक्याला प्लास्टिक पॅकबंद टोपी, मास्क, प्लास्टिक जॅकेट, हॅन्डग्लोज असे परिधान केल्याचे दिसत आहे. या चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.
या चोरीबाबत दुकानाचे मालक अनिल शहा यांनी फलटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांना या 78 तोळे चोरणाऱ्या चोरट्यांना पकडणे म्हणजे डोक्याला घामच फुटला आहे. पोलिसांनी या चोरीच्या शोधासाठी विविध पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. चोरीला 24 तास ओलांडून गेले तरी अद्याप कोणताच आरोपी पोलिसांच्या हाती आलेला नाही.
कडक लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळाली. तुरळक पोलीस ठाणे असतील की त्याठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोडण्याचे गुन्हे वगळता गुन्हा दाखल झाला. मात्र जस जशी सुट मिळत गेली, तसतसे विविध प्रकारचे गुन्हे दाखल होताना पाहायला मिळू लागले. त्यात चोरीच्या प्रकारात दारुची दुकाने बंद असल्यामुळे दारुची दुकाने मोठ्या प्रमाणात फुटली. यातील अनेक गुन्हे दाबले गेले हा प्रकार वेगळा असला तरी दुकाने फुटण्याच्या वाढत्या गुन्हांमुळे पोलिस हतबल झाले होते.
यात तर आता लॉकडाऊन पूर्णतः उठवला जात असताना आता चोरट्यांनी इतरही ठिकाणी हात मारायला सुरुवात केली. त्यात मास्कचा वापर अनिवार्य असल्यामुळे चोरटेही मास्क मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे दिसू लागले आहे. आणि या फलटणच्या घटनेत तर चोरट्यांनी राज्यातल्या इतर चोऱ्यांपेक्षा जास्त, म्हणजे एक प्रकारे इतिहासच घडवला असे म्हणायला काहीच हरकत नाही.