नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशातील कोरोना व्हायरसच्या वेगाने वाढत असलेल्या संसर्गावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी कोविड-19, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी भविष्यात हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अध्ययनाचा विषय असतील, असं म्हटलं आहे.


राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा '21 दिवसात कोरोनाला पराजित करु' या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. 'भविष्यात अपयशाच्या केसस्टडीजमध्ये कोविड-19, नोटबंदी आणि जीएसटीमधील चुका हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अभ्यासाचा विषय असतील.' असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.


25 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला होता.  यावेळी त्यांनी 'आज कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात संपूर्ण देश युद्ध लढत आहे. त्यासाठी आपल्याला 21 दिवस लागणार आहेत. महाभारताच्या काळातील युद्ध 18 दिवसांमध्ये जिंकलं होतं. आज देशातील कोरोना संसर्गाविरोधातील हे युद्ध आपण 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल.' असं म्हटलं होतं.



कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर 

 देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप भारतीयांची चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत, मात्र तितकसं यश अद्याप मिळालेलं दिसत नाही.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 698,817  आहे. आतापर्यंत 19,707 मृत्यू कोरोनामुळं भारतात झाले आहेत. 424,963 लोक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत तर देशात 254,147 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 11,571,722 वर पोहोचली असून आतापर्यंत 537,045 मृत्यू झाले आहेत. तर आतापर्यंत 6,542,709 जण कोरोनामुक्त झाले आहेत.