नागपूरः जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण म्हणजचे तब्बल 291 नव्या कोरोना बाधितांची नोंद बुधवारी प्राप्त अहवालानुसार करण्यात आली. बाधितांपैकी 108 ग्रामीणमधील तर 183 बाधित शहरातील आहेत. तर शहरातील 161 आणि ग्रामीणमधील 53 जणांना कोरोनावर मात केली आहे. अहवालानुसार जिल्ह्यात सध्या 1568 बाधित गृहविलगीकरणात असून 76 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी जिल्ह्यात 2457 RTPCR चाचण्या करण्यात आल्या. दररोजच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. कमी चाचण्यांमुळे प्रशासनावर सतत टीका करण्यात येत असल्याने चाचण्या वाढविण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोना बाधित दोघांचा मृत्यू
चौथ्या लाटेत एका दिवसात पहिल्यांदाच दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मागील 26 दिवसांत 10 मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी दोघे नागपूर जिल्ह्यातील होते. बुधवारी झालेले दोन्ही मृत्यू शहरातील आहे.
रॅपिड अॅन्टीजेन चाचण्यांची संख्याही वाढली
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसह रॅपिड अॅन्टीजेन चाचण्यांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. बुधवारी ग्रामीणमध्ये 866 तर शहरात 2058 चाचण्या करण्यात आल्या.
आरोग्य केंद्रांमध्ये निशुल्क कोरोना चाचणी
नागपूर महानगरपालिकेच्या शहरातील दहा झोनमधील सर्व आरोग्य केंद्रांवर, ग्रामीणमधील आरोग्य केंद्रांवर आणि शासकीय रुग्णालयात निशुल्क कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन स्वतः आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. दिवसेंदिवस शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे थोडाही हलगर्जीपणा अनर्थ घडवू शकतो असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरात वाढली 'व्हायरल' रुग्णसंख्या
वातावरण बदल झाल्याने जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा आदींनी ग्रस्त रुग्णांचीही संख्या वाढली आहे. या आजारात रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने अशा वेळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्यासंदर्भात कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.