ठाणे : उल्हासनगरच्या आगामी महापालिकेसाठी महायुतीमध्येच तिढा वाढण्याची शक्यता आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि ओमी कलानी गटामध्ये युतीची घोषणा झाली. मात्र आमची युती फक्त शिवसेना शिंदे गटासोबत आहे, भाजपासोबत आम्ही नाही असं ओमी कलानी गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भाजपमध्ये अनेक गुन्हेगार असल्याची टीकाही कलानी गटाकडून करण्यात आली.
एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानीमध्ये युती झाली आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगर महापालिकेत भाजपाच महापौर होणार असल्याचा दावा केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उल्हासनगरातील महायुतीमध्येच तिढा वाढला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कलानी गटामध्ये अस्वस्थता
उल्हासनगर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टीम ओमी कलानी समर्थक दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश प्रक्रियानंतर टीम ओमी कलानीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
शिंदे गट-कलानी गटामध्ये युती
माजी आमदार पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांनी शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याच्या निर्णय घेतला. रविवारी उल्हासनगरमध्ये शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी आणि त्यांच्या समर्थकांना पेढे भरून स्वागत केले. शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांच्यात युती झाल्याचे जाहीर केलं.
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, टीम ओमी कलानी आणि शिवसेना शिंदे गटात युती झाली आहे. कोणाचाही पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असा विचार शिवसेना आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा नाही. भाजपासोबत आमची नैसर्गिक युती आहे. या संदर्भात निवडणुकीदरम्यान बोलणे होईल. ममहापौर कुणाचा होणार यावर निवडणुकीनंतर विचार करू असंही ते म्हणाले.
याबाबत टीम ओम कलानी यांचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी सांगितले की, लोकसभेत शिवसेना शिंदे गटासोबत आमची युती होती आणि आम्हाला यश मिळाले. त्याप्रमाणेच दोस्ती कायम ठेवली आहे. महापालिका निवडणुकीत देखील आमच्या युतीला यश मिळेल. विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. भाजपासोबत आमची युती नाही. आम्ही इंडियाचा घटक पक्षही नाही. काही लोक आरोप करतात की, आमचा पक्ष गुन्हेगारांचा पक्ष आहे. भाजपात किती गुन्हेगार आहे हे आम्ही पण सांगू शकतो.
काही लोक आपली गुन्हेगारी लपवण्यासाठी भाजपमध्ये जात आहेत अशी घणाघाती टीका देखील ओमी कलानी गटाचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी केली. दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टीम ओमी कलानी समर्थक दोन नगरसेवक भाजपात गेले. त्यानंतर टीम ओमी कलानी सतर्क झाली. यापुढेही कोणत्याही प्रकारच्या दगाफटका होऊ नये यासाठी टीम ओमी कलानी समर्थकांनी रणनीती आखून शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याच्या निर्णय घेतला.
एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये युती असताना दुसरीकडे टीम ओमी कलानीकडून ठामपणे भाजपासोबत आमची युती नसल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये तिढा निर्माण होणार आहे. यावर तोडगा कसा काढला जातोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उल्हासनगर शहराच्या राजकारण येणाऱ्या काळात महायुतीमध्येच रस्सीखेच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.