Navi Mumbai youth died on siddhagad fort: नवी मुंबईतून ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील तरुणाचा मुरबाडच्या सिद्धगडावर दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे या तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले. साईराज धनेश चव्हाण (वय 21, रा. तळोजा, मूळगाव दहिगाव, सातारा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. साईराज चव्हाण हा रविवारी नवी मुंबईतील 14 जणांच्या ग्रुपसोबत सिद्धगडावर आला होता. मात्र, किल्ल्यावर चढत असताना तोल जाऊन तो खोल दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांनी उर्वरित 13 जणांना किल्ल्यावरुन सुखरुप खाली आणले. मात्र, मुरबाड परिसरात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे साईराज चव्हाण याचा मृतदेह शोधण्यासाठी दोन दिवस लागले. (Youth fall from Fort Near Murbad Thane)
साईराज चव्हाण हा दरीत पडल्यानंतर त्याचा शोध सुरु होता. मात्र, रविवारी ते सोमवार सकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह दरीत दिसला. मात्र, जोरदार पाऊस, डोंगरावरील निसरड्या वाटा आणि धुक्यामुळे हा मृतदेह दरीतून वर आणणे कठीण होऊन बसले. अखेर मंगळवारी दुपारी तीन वाजता साईराज चव्हाण याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आणि कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला.
साईराज चव्हाण हा अत्यंत धाडसी होता. त्याने आतापर्यंत अनेक किल्ले सर केले होते. त्याला भारतीय लष्करात जायचे होते. साईराजने अलीकडेच एनडीएची परीक्षा दिली होती. मात्र, थोड्या गुणांमुळे त्याचा प्रवेश हुकला होता. परंतु, त्याची भारतीय लष्करात जाण्याची इच्छा कायम होती. परंतु, त्याचा मृत्यू झाल्यामुळे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. साईराजच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Rain Trekking on Fort: पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना काळजी घ्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सिद्धगडावरील या दुर्दैवी घटनेनंतर मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी पर्यटकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात डोंगरवाटा निसरड्या झालेल्या असतात. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग वाटते तितके सोपे नसते. किल्ल्यावरील पायवाटा असतात त्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे निसरड्या झालेल्या असतात. त्यामुळे पाय सटकून दरीत पडण्याचा धोका असतो त्यामुळे पर्यटकांनी या दिवसांमध्ये धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
राजगडाच्या बालेकिल्ल्यावरुन कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू, खडकावर आपटल्याने जागेवरच प्राण सोडला