Pune News: राजगड किल्ल्यावर असलेल्या अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. कोमल शिंदे (वय 21 वर्ष, रा. आळंदी, पुणे) असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. शिंदे दाम्पत्य राजगडावर (Rajgad Fort) फिरायला आले असताना ही दुर्घटना घडली. गुरुवारी 5 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कोमल शिंदे (Komal Shinde) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोमल या पतीसोबत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेले असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोमल शिंदे या  बालेकिल्ल्याच्या अति बिकट वाटेवरुन 400 फूट खाली कोसळल्या. संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायवाटेवर असणाऱ्या कड्याच्या खडकावर आपटून त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा झाल्या होत्या. परिणामी जोरदार रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू पथकाने गडावर धाव घेत रात्री उशिरा कोमल यांचा मृतदेह गडावरून खाली आणला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेल्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Rajgad Fort Accident: राजगडावर रात्री नेमकं काय घडलं?

कोमल शिंदे आणि तिचे पती गुरुवारी दुपारी राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. दुपारी पडलेल्या पावसामुळे किल्ल्याच्या पायवाटा निसरड्या झाल्या होत्या. सायंकाळी किल्ला उतरत असताना कोमल बालेकिल्ल्याच्या खडतर वाटेवरून खाली कोसळली. ती संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायथ्याशी पडली. खडकावर आपटल्याने तिच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आणि शरीरातून बराच रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू पथकाने किल्ल्यावर धाव घेतली. स्थानिक कार्यकर्ते संकेत खरात आणि रामभाऊ ढेबे यांनी कोमल हिचा मृतदेह गडाच्या पद्मावती माचीवरील राजसदरेच्या प्रांगणात आणला. 

गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अंमलदार पी.एच. सुर्यवंशी, स्थानिक पोलीस पाटील विश्वास शिर्के, पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे आणि हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले यांनी तातडीने राजगड गाठला. रात्री उशिरा कोमल शिंदे यांचा मृतदेह खाली आणण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Raigad Fort: रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा

आज किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.  351 वर्षांपूर्वी, 1674 साली 6 जून रोजी रायगडावर रयतेच्या साक्षीने, देशभरातून आलेले विद्वान पंडित, सामान्य रयत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. आजच्या सोहळ्याला रायगड किल्ल्यावर तीन ते चार शिवभक्त दाखल झाले होते. त्यामुळे रायगड किल्ल्यावर सध्या प्रचंड गर्दी आहे. या सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा

गुरं चरत असताना महिलेला झुडूपांमध्ये काळी कार दिसली,जवळ जाताच हादरली, शहापुरातील घटनेमुळे खळबळ