Thane News : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) मेट्रो मार्गाचं काम सुरु आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत रिलायन्स अस्टाल्डी जॉइन्ट व्हेंचर या कंपनीकडून मेट्रो 4 चे (Metro 4) काम चालू असून मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार येत आहे. या कामामुळे ब्रह्मांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्यासाठी घोडबंदर रोड 25, 26, 27, 28, 29 आणि 30 डिसेंबर 2022 पर्यंत रात्री 23.55 ते सकाळी 04.00 वाजेपर्यंत वाहतुकीकरता बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
घोडबंदर मार्गावरुन जड, अवजड तसंच हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या मार्गावर सध्या घाटकोपर ते गायमुख या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर उद्यापासून ते 30 डिसेंबर पर्यंत रात्री 11.55 ते पहाटे 4 पर्यंत मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकले जाणार आहेत. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.
असे आहेत वाहतुकीमधील बदल!
मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन इथे प्रवेश बंद करण्यात येत आहे तर मुंबई ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका मानकोली अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अनुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाण्याच्या सर्व जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.