Jitendra Awad: राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awad) यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे नावाची व्यक्ती पैसे मोजताना दिसत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.  


महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे या व्हिडीओमध्ये पैसे मोजताना दिसत आहेत असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान पालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला जीवे मारण्याच्या उल्लेख करण्यात आला आहे. 


 






महेश आहेर यांना मारहाण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक


जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जायवाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे. या कार्यकर्त्यांवर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याचा पोलिसांना संशय आहे.


दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 


काय म्हटलंय त्या ऑडिओ क्लिपमध्ये? 


व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा हा आवाज असल्याचा आरोप आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा: