Central Railway Power Block : मध्य रेल्वेवर शनिवारी-रविवार-सोमवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. टिटवाळा- आसनगाव दरम्यान हा रात्रकालीन विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याशिवाय, रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला प्रवास करताना प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे. 


कुठे असणार मध्यरात्रीकालीन पॉवर ब्लॉक


मध्य रेल्वे दिनांक 10-11 फेब्रुवारी आणि 12-13 फेब्रुवारी मध्यरात्री  2.05 ते 05.35 या कालावधीत टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर  इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलासाठी चाचणीकरीता रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 12.15 वाजता सुटणारी कसारा लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणार आहे. तर, कसारा येथून पहाटे 3.51 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीताची लोकल ठाणे येथून धावणार आहे.


या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार परिणाम 


खालील गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे 35  मिनिटे ते 95 मिनिटांपर्यंत नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा उशिराने गंतव्यस्थानी पोहोचणार आहेत. 



  • ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस  सुपरफास्ट एक्स्प्रेस 

  • ट्रेन क्रमांक 11402  आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस 

  • गाडी क्रमांक 12112 अमरावती - मुंबई एक्स्प्रेस 

  • गाडी क्रमांक 12106  गोंदिया - मुंबई एक्स्प्रेस 

  • गाडी क्रमांक 12112  अमरावती - मुंबई एक्स्प्रेस 

  • ट्रेन क्रमांक 17058  सिकंदराबाद- मुंबई एक्स्प्रेस 

  • ट्रेन क्रमांक 12618 निजामुद्दीन- एर्नाकुलम 

  • ट्रेन क्रमांक 12138  फिरोजपूर - मुंबई पंजाब मेल 

  • गाडी क्रमांक 12290  नागपूर - मुंबई एक्स्प्रेस 

  • ट्रेन क्रमांक 12102  शालीमार - मुंबई एक्स्प्रेस 

  • गाडी क्रमांक 12132 साईनगर शिर्डी - दादर एक्स्प्रेस 

  • ट्रेन क्रमांक 12545 रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 


मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर मेगा ब्लॉक


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 12 फेब्रुवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. विद्याविहार आणि ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. तर, पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर  (बेलापूर-खारकोपर BSU लाईन वगळून) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून 10.33 ते 15.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून  सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत  पनवेल/बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि 10.01 ते  दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.