Thane News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आज ठाण्याला (Thane) जाणार आहेत. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. दरम्यान रोशनी शिंदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं कळतं. 


ठाकरे गटाच्या पदाधिकारी रश्मी शिंदे यांना सोमवारी (3 एप्रिल) मारहाण झाली होती. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना दुखापत झाली असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणाची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रोशनी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह ठाण्याला जाणार आहेत. दुपारी एकच्या सुमारास दोघेही ठाण्यात पोहोचून रोशनी शिंदे यांची भेट घेतील असं समजतं.


मुख्यमंत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक


दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आनंदाश्रमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती मुख्यमंत्र्यांकडून कालच्या राड्याबाबतची इंत्यंभूत माहिती घेण्यात आली.


फेसबुक पोस्टवरुन राडा


फेसबुकवरील पोस्टवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला आणि त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


अद्याप गुन्हा नाही


या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा खासदार राजन विचारे यांनी म्हटलं होतं. गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आहेत. या प्रकरणावरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा वादही समोर येत आहे.


संबंधित बातमी


Thane News : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, अद्याप FIR दाखल नाही; कार्यकर्ते आक्रमक