Thane Ring Metro: ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. ठाण्यातील दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला “ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प” (Thane Ring Metro Project) आता प्रत्यक्षात आकार घेणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या मेट्रोच्या बांधकामाला अधिकृत सुरुवात होणार असून, या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.
या मेट्रोच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. ठाणे हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असून, येथील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून हा रिंग मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे.
Thane Ring Metro: 29 किमी लांबीचा मेट्रो कॉरिडॉर
या प्रकल्पाअंतर्गत एकूण 29 किलोमीटर लांबीचा मेट्रो कॉरिडॉर उभारला जाणार आहे. हा मार्ग वागळे इस्टेट, मानपाडा, बाळकुम आणि ठाणे जंक्शन अशा ठाण्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागांना जोडेल. या भागांना मेट्रोने जोडल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल तसेच शहरातील रस्त्यांवरील ताण कमी होईल.
Thane Ring Metro: 12,200 कोटी रुपयांचा खर्च
केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, एकूण अंदाजे 12,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. हा मार्ग उल्हास नदीपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत विस्तारित असणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही मेट्रो लाईन 2029 पर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल आणि त्या वेळेस दररोज सुमारे 6.47 लाख प्रवासी या मेट्रो सेवांचा लाभ घेतील. पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Thane Ring Metro: एकूण 22 स्थानकं, त्यापैकी दोन भूमिगत
ठाणे रिंग मेट्रो मार्गावर एकूण 22 स्थानकं प्रस्तावित आहेत. त्यापैकी 20 स्थानकं उन्नत (एलिवेटेड) तर 2 स्थानकं भूमिगत (अंडरग्राऊंड) असतील.
Thane Ring Metro: मेट्रो मार्गावरील स्थानकांची यादी
ठाणे जंक्शन, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, नवीन ठाणे, गांधी नगर, नीळकंठ टर्मिनल, रैला देवी, शिवाई नगर, काशिनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, विजय नगरी, वाघबिळ, डोंगरीपाडा, मनोरमानगर, पाटीलपाडा, आझादनगर बस डेपो, वॉटर फ्रंट, बाळकुम नाका, शिवाजी चौक, राबोडी, कोलशेत इंडस्ट्रिअल एरिया आणि बाळकुमपाडा.
या पैकी ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे ही दोन स्थानकं भूमिगत असतील, तर उर्वरित 20 स्थानकं उन्नत स्वरूपात उभारली जातील.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा