Thane Potholes : मुंबईला (Mumbai) लागून असलेल्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ठाण्यातील दिवा-आगासन रस्त्यावर हा अपघात घडला. खड्ड्यामुळे तरुणाचा तोल गेला आणि त्याचवेळी समोरुन येणाऱ्या ट्रकची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सवाल विचारला आहे. दिवा ठाण्यात आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री, खड्ड्यांमुळे अजून किती बळी घेणार?, असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.


काय आहे घटना?
ठाण्यातील दिवा-आगासन रस्त्यावर रविवारी (28 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला. गणेश विठ्ठल फले असं या मृत तरुणांचं नाव आहे. आगासन रस्त्यावरील आगासन फाट्याजवळ रात्री आठच्या सुमारास 20 वर्षीय गणेश फले (राहणार - ग्लोबल इंग्लिश स्कूल जवळ, ओमकार नगर,अगासन रोड, दिवा) हा तरुण दुचाकीवरुन दिवा इथे जात होता. यावेळी आगासन रस्त्यावरुन जात असताना खड्ड्यांमुळे त्याचा ताबा सुटला आणि तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी समोरुन येणारा पाण्याचा टँकर तरुणाच्या अंगावरुन गेल्याने तो जखमी झाला. तिथून जाणाऱ्या नागरिकांनी गणेश फलेला तातडीने रुग्णवाहिकेमधून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मुंब्रा पोलिसांनी घटनाचा पंचनामा केला.  


हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तरुणाचा तोल गेला आणि समोरुन येणारा ट्रक त्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. 


राजू पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हेच सीसीटीव्ही दृश्ये ट्विटरवर शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल विचारला आहे. राजू पाटील यांनी रविवारी रात्री अकराच्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दिवा ठाण्यात, आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री…..दिव्यात आज पुन्हा एकदा खड्ड्यामुळे बळी गेला. कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत पण कामं होत नाहीत. अजून किती बळी घेणार?"