Thane News : "रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसंच त्या गर्भवती (Pregnant) नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर आहे," अशी माहिती त्यांच्या उपचार करणारे डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशन शिंदे यांच्यावर ठाण्यातील (Thane) संपदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 24 तास देखरेख करण्यासाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याचं डॉ. आलेगावकर यांनी सांगितलं.
ठाण्यात सोमवारी संध्याकाळी मोठा राडा झाला. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे या गर्भवती असल्याच शक्यताही वर्तवली जात होती. परंतु रोशनी शिंदे यांची काल रात्री आणि आज सकाळी केलेली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्या गर्भवती नाहीत, असं डॉ. उमेश आलेगावकर यांनी स्पष्ट केलं.
मुका मार आहे, रक्तस्राव नाही : डॉक्टर
डॉक्टरांच्या माहितीनुसार, "काल रात्री साडेदहाच्या दरम्यान रोशनी शिंदे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सिव्हिल रुग्णालयातून माझ्या रुग्णालयात दाखल केलं. आपल्यावर काही जणांनी हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक उपचार सिव्हिल रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी माझ्या रुग्णालयात दाखल झाल्या. क्लिनिकल तपासणीत शरीरावर मारहाणीच्या हलक्या खुणा होत्या. पूर्णत: तपासणी केली असता रक्तस्राव झाल्याचं दिसत नाही. पाठीवर मुका मार आहे. काल रात्री आणि सकाळी केलेली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने सोनोग्राफी करण्यात आली, तिथे रक्तस्राव नसल्याचं दिसून आलं. तसंच कुठेही फ्रॅक्चर नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे."
फेसबुक पोस्टवरुन राडा
फेसबुकवरील पोस्टवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला आणि त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अद्याप गुन्हा नाही
या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा राजन विचारे यांनी म्हटलं होतं. गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आहेत. या प्रकरणावरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा वादही समोर येत आहे.
रोशनी शिंदेंची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज ठाण्याला जाणार आहे. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. दरम्यान रोशनी शिंदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं कळतं.