Thane News : ठाण्यातील मुंब्रामधील (Mumbra) कौसा परिसरात मंगळवारी रात्री दूध विक्रेता एका उंच इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये (Lift Duct) मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसंच मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जटाशंकर पाल असं मृत दूध विक्रेत्याचं नाव आहे. काल नेहमीप्रमाणे दूध वितरित करण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. मात्र इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये त्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


शोधाशोध केल्यानंतर दूध विक्रेता लिफ्ट डक्टमध्ये मृतावस्थेत सापडला!


कौसा परिसरातील अलमास कॉलनी इथल्या अनमोल एमराल्ड इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये दूध विक्रेत्याचा मृतदेह आढळून आला. संबंधित दूध विक्रेता घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांना फोन केला. त्यावेळी समोरुन एका व्यक्तीने त्यांचा फोन उचलून फोन, चावी, गाडी आणि दूध बाहेरच असल्याचं विक्रेता मात्र कुठेही दिसत नसल्याचं सांगितलं. यानंतर कुटुंबियांनी तातडीने इमारतीकडे धाव घेतली. त्यावेळी विचारपूस केल्यानंतर, शोधाशोध केल्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्याचा मृतदेह लिफ्ट डक्टमध्ये आढळला. कुटुंबियां याची माहिती मुंब्रा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसंच मृत दूध विक्रेत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


मृत्यू नेमका कसा झाला?


या मृत दूध विक्रेत्याचं नाव जटाशंकर पाल (वय 45 वर्ष) असून त्याचा दुधाचा व्यापार होता. काल (18 जुलै) पहाटे नेहमीप्रमाणे तो अनमोल एमराल्ड इमारतीमध्ये दूध वितरीत करण्यासाठी गेला होता, त्याच दरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज स्थानिकांनी दर्शवली आहे. मृत जटाशंकर पाल हा लिफ्टखाली कसा गेला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. एखादी वस्तू बाहेर काढण्यासाठी लिफ्ट खाली उतरला असावा आणि बाहेर निघता न आल्याने त्याचा लिफ्ट खाली चिरडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 


पोलिसांचा अंदाज काय?


तर मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक एन कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दूध विक्रेत्याने तळमजल्यावरुन लिफ्टचे बटण दाबले होते. लिफ्टची ट्रॉली तिथेच असल्याचं समजून त्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॉली वरच्या मजल्यावर होती, पण काही समजायच्या आत तो दुधाच्या किटल्यांसह खाली पडला असावा. त्याने मदतीसाठी हाक मारण्याचाही प्रयत्न केला असेल, पण तिथे कोणाचं लक्ष गेलं नसावं."


याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतर जटाशंकर पालचा मृत्यू कसा झाला हे समोर येईल.


हेही वाचा


Mumbai News : लोअर परेलमध्ये ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, नऊ जण जखमी