Mumbai Nasik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. पडघा नजीकच्या खडवली फाटा या धोकादायक वळणावर मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. 


पडघा व परिसरातील असंख्य विद्यार्थी, चाकरमानी, रेल्वेने कल्याण ठाणे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी खडवली रेल्वे स्टेशन येथे जात असतात. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास MH 04 E 1771 ही काळी पिवळी जीप प्रवासी घेऊन जात होती.  जीप खडवलीकडे जात असताना त्याच सुमारास कंटेनर क्रमांक MH 48 T 7532 हा मुंबईच्या दिशेने भरधाव येत होता. कंटेनरने जीपला जोरदार ठोकर दिली. त्यानंतर कंटेनरने जीपला अक्षरशः फरफटत शेतात लोटून दिले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये विद्यार्थी असलेल्या चिन्मयी विकास शिंदे वय 15, रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे वय  27, संतोष अनंत जाधव वय 50, वसंत धर्मा जाधव वय 50 आणि प्रज्वल शंकर फिरके वय 18 यांचा मृत्यू झाला आहे.  या अपघातात दिलीप कुमार विश्वकर्मा वय 29,  चेतना गणेश जसे वय 19, कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय  22, जान्हवी संजय वाळंज आणि वाहन चालक जावेद अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीत  खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे. शिवशंकर जंगीलाला प्रजापती यास पडघा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर स्थानिक भगवान सांबरे यांनी या अपघातास कंटेनर चालकासह या महामार्गावर टोल वसूल करणारे ठेकेदार व सीगल इंडिया ही महामार्ग बनविण्याचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  


खडवली फाटा अपघात स्थळाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप


मुंबई नाशिक महामार्गावर खाजगीकरणातून रस्ते चौपदरीकरण केले. पण धोकादायक ठिकाणी उड्डाणपूल बनवावेत अशी मागणी मागील कित्येक वर्षे केली जात आहे. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं झाली. पडघा ते घोटी दरम्यान अनेक उड्डाणपूल भुयारी मार्ग मंजूर केले. केंद्रीय राज्यमंत्री यांनी चार वर्षांपूर्वी चार उड्डाणपुलांच्या कामाचे भूमिपूजन केले. टोलनाका ठेकदर यांच्या आडमुठे पणामुळे उड्डाणपूलाचे काम रखडून राहिले आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख ग्रामीण विश्वास थळे व काँग्रेस पदाधिकारी राकेश पाटील यांनी केली आहे. जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळीच या ठिकाणचा उड्डाणपूल बनवला असता तर आजपर्यंत अनेकांचे जीव वाचवता आले असते. अशी टीका होत असून 9 जुलै रोजी सुध्दा याच ठिकाणी एका भरधाव टँकरने धडक दिल्याने रस्त्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पण प्रशासनाला जाग का येत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.