मुंबई: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी ठाणे महापालिकेच्या कारभारावरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी टीका केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावरुन त्यांनी टीका केली आहे. आमचं दुखणं वेगळं आहे, सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही असं सांगत त्यांनी नव्या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत.
आज विधीमंडळाच्या कामकाजावेळी (Maharashtra Monsoon Session) भाजपचे आमदार केळकर यांनी ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंबंधी प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, ठाण्यामध्ये मेट्रो संबंधी अंतर्गत कामं सुरू आहेत. हा प्रकल्प अजून सुरू झाला नाही पण त्यामुळे धोकादायक ठरलेल्या इमारतींमधील लोक बाहेर गेलेले आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्यात आली नाही. मेट्रोचं काम कधीही सुरू होवो, पण यावर सर्वांनी एकत्रित बसून तोडगा काढला पाहिजे.
आमचं दुखणं वेगळं...
मुंबईचं दुखणं वेगळं आहे. ठाण्यातील परिस्थिती अशी आहे की आमचं दुखणं वेगळं आहे, सांगताही येत नाही, आणि दाखवताही येत नाही. शहरातील अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचं दाखवूनही कोणावरही कारवाई करण्यात येत नाही, त्याला जबाबदार असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही. अधिकाऱ्यांमधील वाद हे कधी कधी पोलीस स्टेशनमध्ये जातात.
काही अधिकाऱ्यांच्यामुळे ठाण्यात अनाधिकृत बांधकामाचं जाळं सुरु आहे. हे अधिकारी या अनाधिकृत बांधकामात प्रति स्क्वेअर फुटांप्रमाणे पैसे घेतात. या संदर्भात अनेक तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दिल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. या उलट या अधिकाऱ्यांना महत्वाच्या जबाबदारी देऊन त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. हे अधिकारी सरकारचे जावई आहेत का?
या अधिकाऱ्यांच्या समोर महापालिका आयुक्त हतबल झाले असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, महेश अहिर या अधिकाऱ्याची बोगस डीग्री असतानाही त्यांना अनेक महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. हे अधिकारी सुपारी घेऊन काम करतात.
आमदार संजय केळकर यांनी ज्या महेश अहिर या अधिकाऱ्याचा उल्लेख केला आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात.
राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्रित येऊन नव्या सरकारची स्थापना झाली. सुरुवातीला मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन, मंत्रिपदांवरुन त्यांच्यात काहीशी कुरबुऱ्या सुरू झाल्या. आता एकनाथ शिंदे यांच्या हातात असलेल्या ठाणे महापालिकेच्या कारभारावरुन भाजपमध्ये नाराजी असल्याचं दिसून येतंय. आज भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आमचं दुखणं वेगळं असल्याचं सांगत थेट विधानसभेत जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात शिंदे गट आणि भाजपमध्ये यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.