मुंब्रा : मागील काही दिवसांपासून मुंब्रा (Mumbra) शहर मध्यवर्ती शिवसेना (Shiv Sena) शाखेचा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण देखील कमालीचे तापल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतयं. शिंदे गटाने (Shinde Group) शाखा ताब्यात घेऊन ती शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) तीव्र विरोध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा ट्वीट करण्यात आलं. त्यावर दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलीये. जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटवर शिंदे गटाकडून आरोप करण्यात आलेत. तसेच ठाकरे गटाकडून याबाबत शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आलाय. 


मुंब्र्यातील शाखेचा वाद निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे  शाखेला भेट देण्यासाठी पोहचले. पण पोलिसांनी त्यांना शाखेजवळ न जाण्याचं आवहन केलं. त्यामुळे शाखेजवळून अवघ्या 10 मीटरवरुन उद्धव ठाकरेंची गाडी माघारी फिरली. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी शाखेपर्यंत जाणं टाळलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. 


शिंदे गटाने काय म्हटलं ?


मुंब्रा शिवसेना शाखेला घेऊन पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे.  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करत प्रशासनाला धारेवर धरलं. याबाबत शिंदे गटातील मुंब्रा शहर प्रमुख मोबिन सुर्वे यांनी शिवसेना शाखेची कागद पत्र दाखवत ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केलेत. मुंब्रा शिवसेना मध्यवर्ती शाखा हे गुरुचरण जागेवर नसून ती जागा खाजगी मालक विठ्ठल को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांनी आनंद दिघे असताना 1999 साली दिली .या अगोदर ही शाखा रस्ते पुनर्वसनामध्ये हलवण्यात आली होती.  या शाखेचे लाईट बिल ,कर स्वरूपात पावती ही  शिवसेना मध्यवर्ती शाखा मुंब्रा या नावाने आहे.  त्याचे पैसे देखील जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा कार्यालयातून भरले जातात.  त्यामुळे या शाखेचे पुनर्बांधणी करण्याचं काम आता शिंदे गटाचे राजन किने यांच्यामार्फत आता सुरू आहे .जनतेची काम होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आता एक कंटेनर उभा करण्यात आलेला आहे .असे मुंब्रा शहर प्रमुख मुबिन सुर्वे यांनी सांगितले आहे.


ठाकरे गटाचे आरोप


ही शाखा आनंद दिघे यांच्या काळात मुंब्रा या ठिकाणी बांधण्यात आली होती. रस्ते पुनर्वसन मध्ये जी जुनी शाखा स्थलांतरित झाली ती आतल्या बाजूला करण्यात आलीये.   याचे सर्व पुरावे आणि कर आम्ही आतापर्यंत भरत आलो आहोत .शाखा तोडताना पोलीस प्रशासन यांना हाताशी घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटातील विजय कदम मुंब्रा शहर प्रमुख यांनी केलाय.  येणाऱ्या काळात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचे देखील कदम यांनी सांगितले. 1987 ते 1998 पर्यंत जुनी शाखा होती त्यानंतर 1998 साली समोरच्या म्हणजे आतल्या जागेत नव्याने शाखा बनवण्यात आली. मात्र आता त्याच जागी जुनी शाखा तोडून अवैद्य रित्या नवीन शाखा बांधत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. 


जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट नेमकं काय?


 मुंब्र्यातील शिवसेना शाखेला घेऊन पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय.  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करत प्रशासनाला धारेवर धरलंय. मुंब्र्याची जी शाखा पडली तिची पुनर्बांधणी दिवस रात्र चालू आहे आणि पोलिसांना देखील याबाबत माहिती आहे. पण तरीही महापालिका कर्मचारी आंधळे झालेत. ही जागा गुरचरण आहे आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा स्पष्ट आहे. गुरुचरण जमिनीवर बांधकाम करता येणार नाही. पण तराही हे अवैध बांधकाम जोरात सुरु असल्याचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.


हेही वाचा : 


Ramdas Kadam and Gajanan Kirtikar : ऐन दिवाळीत शिंदे गटात शिमगा; गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ, रामदास कदम-गजानन कीर्तीकर वादाने टोक गाठलं!