ठाणे : महापालिकेच्या हद्दीतील वागळे इस्टेट येथे अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला (Thane Hawkers Attack)  केला. मंगळवार संध्याकाळच्या सुमारास सदरची घटना घडली. यामध्ये फेरीवाल्यांनी अतिक्रमण वाहनांवर दगडफेक केली असून पालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. यात दोन वाहनांची नुकसान झाले आहे. महापालिकेकडून यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 


वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर 16 या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहने निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीच्या काचेवर दगड मारण्यात आला. दरम्यान, ठाण्यात फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वागळे परिसरात घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आला आहे.


घटनेची माहिती मिळताच पालिका उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी घोडबंदर येथे तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची अक्षरशः बोटे छाटण्यात आली होती. त्यामुळे या हल्ल्यानंतर पालिका आयुक्त फेरीवाल्यांवर कशाप्रकारची कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


पावतीचे पैसे देऊनही कारवाई केली जाते


महिलेने काढलेल्या व्हिडीओच्या आधारे पालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आला आहे. याठिकाणी बसण्यासाठी आमच्याकडून पावती फाडली जाते. मात्र पालिकेकडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी फेरीवाल्यांनी सांगितले.


कल्याणमधील परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई करा


कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा इथून पुढे फेरीवाल्यांना नाही तर फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना ठोकू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी दिला. परप्रांतीय फेरीवाले आणि मराठी तरुण वाद प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. 


मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी फेरीवाल्यांवर कारवाईबाबत महापालिकेला पत्र पाठवले, तसेच ही कारवाई सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.


ही बातमी वाचा: