Thane Crime News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे शहरातील (Thane City) कायदा आणि सुव्यवस्था (Law And Order) धोक्यात आली की काय असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. आज दिवसभरात गोळीबाराच्या (Thane Firing) दोन घटना घडल्या. आज, सकाळी घंटाळी देवी रोडवर झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असताना वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी गोळीबाराची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. दिवाळी सण सुरू होत असताना गोळीबाराच्या घटना घडल्याने ठाण्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नं 4 मध्ये गोळीबाराची घटना घडली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या असे जखमींचे नाव आहे. जखमी असलेला गणेश जाधव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापूर्वी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबाराची घटना घडली. पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यावेळी तीन राऊंड्स फायरिंग करण्यात आली. त्यातील एक गोळी एकाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस सापडले.  घंटाळी मंदिर रोड वरील साईबाबा मंदिराजवळील परिसरात गोळीबार झाला. हा परिसर अंत्यत शांत, उच्चभ्रू आणि वर्दळीचे ठिकाण समजले जाते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 


ठाण्यातील याआधीच्या गोळीबाराच्या घटना


मागील काही दिवसात ठाण्यात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. याआधी 17 सप्टेंबर रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारवर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही.  7 ऑक्टोबर रोजी आर्थिक देवाण घेवाण वादातून कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करण्यात आल होता. त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. 


ठाणे पोलिसांचा वचक नाही?


मागील काही दिवसात ठाणे शहरात उघडपणे गोळीबाराच्या घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ठाणे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला का, असा प्रश्न निर्माण होत आहे. ठाणे शहरात, जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे मुख्यमंत्री शिंदे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणणारे ठरू शकते.