Shrikant Shinde on Aaditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज (24 फेब्रुवारी) ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गुवाहाटीला जाण्यापासून ते पार बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी श्रीकात यांनी अनेक राजकीय टिपण्णी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाण्यामधील चर्चेत असलेल्या लोकसभेच्या उमेदवारीवरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.  


आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. या दौऱ्यामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकताना राजीनामा द्या, तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर आव्हान दिले होते. याच आव्हानाचा संदर्भ घेत अवधूत गुप्ते यांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा यांकडे कसे बघता असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना विचारला. 


आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय?


यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.  ते म्हणाले की, आव्हान कोण देतं आणि त्याला प्रतिसाद काय द्यायचा आपण ठरवायला हवं. हत्तीने आपली चाल चालत राहावी, मागे कोण काय बोलतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय? शिंदे साहेब हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


युवा सेना प्रमुख पद का घेत नाही? असे विचारण्यात आले असता त्यांनी कोणाला असे वाटायला नको की नंबर वन पद ब्लॉक आहे. कोणतेही लाभाचे पद मी घेणार नाही असे आधीच सांगितले होते. आज पुर्वेश कार्याध्यक्ष आहेत, मला ते नको होते असे ते म्हणाले.


ठाणे सोडून जायची वेळ आली आहे का?


ठाणे सोडून जायची वेळ आली आहे का? असं विचारण्यात आला असता श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की 2014 मध्ये जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा मी उमेदवार झालो. शिंदे साहेबांनी रात्रंदिवस काम केले तेव्हा कल्याणमध्ये लोकसभा निवडणूक लढली आणि दीड लाखांच्या फरकाने मी जिंकलो. मी तेव्हा 27 वर्षांचा होतो. पुन्हा त्याच लोकांनी मला साडे तीन लाखांनी जिंकवले. माझ्याकडे चॉईस नव्हती असे ते म्हणाले. 


दरम्यान, त्यांना गुवाहाटीला सर्वजण दिसून आले मात्र तुम्ही दिसला नाही? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, सगळे तिकडे असताना एकटे कोणीतरी पाहिजे ना? मी घरीच ठाण्याला होतो. हे जाणार हेच मला माहीत नव्हते. साहेब 19 तारखेला गेले तेव्हा मला माहित नव्हते. जेव्हा न्यूजमध्ये पहिले तेव्हा कळालं. त्यामुळे काही प्लॅन वगैरे नव्हतं, त्यांना अचानक वाटल्याने ते गेले. 


इतर महत्वाच्या बातम्या