ठाणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आजही या देशातील मूळ पुरुष म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज असंख्य नागरी सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहण्यात येत आहे. अशीच एक घटना भिवंडी तालुक्यात समोर आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपट्टी वसुली करणाऱ्या अनधिकृत ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबीयांचे पाणी तब्बल तीन महिन्यांपासून बंद केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे.


भिवंडी तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी 35 आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या गावत मुंबई महानगरपालिकेच्या पाईप लाईनवरील नळ जोडणीतून पाणीपुरवठा केला जातो. त्याचे पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतीच्या नावाने दिले जाते. परंतु गावातील पाणीपट्टी वसुली ही गाव पातळीवरील स्थानिक ग्रामस्थांच्या हातातील ग्राम पाणीपुरवठा समिती करत असल्याने त्यांनी प्रतिमाह 100 रुपये दिले नसल्याचा आरोप करीत थेट या वस्तीतील पाणीपुरवठा खंडित केला आहे.
          
या घटनेची माहिती स्थानिक महिलांनी श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार आणि तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांना दिली. त्यांनी या महिलांना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल होत आंदोलन केले. 


मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा संबंधित ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा केला जातो. परंतु स्थानिक ग्राम पाणीपुरवठा समितीकडून आदिवासी कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. येथील संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि अनधिकृत पाणीपट्टी वसुली करणाऱ्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.


आम्ही कातकरी वारली समाजाचे असल्याने आमच्या वस्तीतील सर्व कुटुंबीय दरमहा पाणीपट्टी जमा करून समितीकडे देतो. पण मागील तीन महिन्यांपासून पाणी देत नसल्याने आम्ही या समितीसह ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही आमची दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थ महिला बेबिबाई खांजोडे यांनी बोलून दाखवली आहे.


ही बातमी वाचा :