ठाणे: आमदारांच्यानंतर आता नगरसेवकांचेही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. आज उल्हासनगरच्या (Ulhasnagar) 18 नगरसेवक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता स्थानिक पातळीवरही धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे. आज या राज्यातील आमदारांसोबत अनेक नगरसेवक, शाखाप्रमुख, शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, आज उल्हासनगरचे 15 शिवसैनिक आपल्यासोबत आले आहेत, त्यांना हे आपलं सरकार वाटतंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


राज्यातील 50 आमदार आणि अनेक पदाधिकारी आपल्यासोबत असल्याने आपल्याला राजकारण करायचं नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांची द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका होती, त्यांचं आपण स्वागत करत असल्याचंही ते म्हणाले.


ठाणे महापालिकेतील जवळपास 65 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर नगरसेवकांचे इनकमिंग जोरात सुरू झाले. त्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण डोंबवलीमधील नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाकडे कल दर्शवला. आता नाशिक, दिंडोरी आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जातोय. 


मुंबईच्या नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शितर म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. 


बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या समाधीचे दर्शन
गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिंना वंदन केलं. नंतर त्यांनी ठाण्यात जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतिंना वंदन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच इतक्या मोठ्या पदापर्यंत सर्वसामान्य शिवसैनिक पोहोचू शकलेला आहे, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार आम्ही पुढे नेतोय असं सांगितलं. महाराष्ट्राचा विकास हेच युती सरकारचं ध्येय आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.