ठाणे: रश्मी ठाकरे टेंभी नाका देवीचे दर्शन घेत असताना त्या ठिकाणचे पंखे आणि कुलर बंद करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने शिंदे गटावर केला. देवाच्या दारात किती खोटेपणा करायचा याला काही मर्यादा असतात अशी टीका ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी शिंदे गटावर केली. त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका देवीचं दर्शन घेतलं आणि आरती केली. त्यावेळी त्या ठिकाणचे पंखे, साऊंड सिस्टिम आणि कुलर बंद करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यावेळी बोलताना रेखा खोपकर म्हणाल्या की, "अरे देवाच्या दारात किती खोटेपणा कराच आहे याला काही मर्यादा असतात. ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिकडे कुलर बंद केले, पंखे बंद केले, साउंड बंद केले. तुम्ही कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही. खोटेपणाने वागताय ते देव बघतोय आणि देव याची प्रचीती देईल. या कृत्यातून त्यांना कदाचित सुख  मिळलं असेल, पण यांची कोत्या मनाची वृत्ती आज सगळ्यांसमोर आली."


रेखा खोपकर म्हणाल्या की, "आज टेंभी नाकाची देवी ही दिघे साहेबांची देवी अशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज जवळजवळ 47 वर्ष अंबाबाईचा जागर होत आहे. अंबाबाईंचा जागर होत असताना बाळासाहेब असो, उद्धव साहेब असो वा रश्मी वहिनी असो... सगळे ठाकरे कुटुंब हे पहिल्यापासून टेंभी नाक्याला दर्शनासाठी येत असतात. त्याप्रमाणे या वर्षी देखील आल्या. पण त्यांच्या दर्शनाच्या वेळी यांनी आपली वृत्ती दाखवली."


निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, फक्त आता या सरकारचा जो नाकर्तेपणा आहे, नालायकपणा आहे... त्या नालायकपणामुळे जे पुढे तारीख तारीख पे तारीख चालली आहे. पण शेवटी विजय हा सत्याचाच होणार असल्याचंही रेखा खोपकर म्हणाल्या.