Maharashtra Politics Rajan Vichare :  शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देणारे खासदार राजन विचारे (Shivsena MP Rajan Vicahre) यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. राजन विचारे यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना अनावृत्त पत्र लिहिले असून ठाण्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का पुसणार असल्याचे विचारे यांनी म्हटले आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात मोठी फूट पडली. जवळपास सर्व नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत. खासदार राजन विचारे आणि नगरसेविका असलेली त्यांची पत्नी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. रविवारी, राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह ठाण्यातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. 


त्यानंतर आज राजन विचारे यांचे आज एक पत्र व्हायरल झाले आहे. राजन विचारे हे आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले शिवसैनिक आहेत. त्यामुळे या पत्रात भावनिक सादही घातली असल्याचे दिसत आहे. राजन विचारे यांनी या पत्रातून  आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.  ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद कदापिही पुसू देणार नाही. पुन्हा एकदा तुमचा शिवसैनिक या वादळातही पहाडासारखा उभा राहील. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशी साद राजन विचारे यांनी पत्रातून घातली आहे. 


राजन विचारे यांनी पत्रात काय म्हटलं?


प्रति, 
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांस...


जय महाराष्ट्र साहेब...
साहेब, आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. पण असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. आज जरा जास्त आठवण येतेय...


वयाच्या सोळाव्या वर्षापासून आम्ही तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो. या सगळ्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होतात. अजूनही अंधारात वाट दाखवत सोबतच आहात. अगदी धगधगत्या दिव्यासारखे...


पण, साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे...तितका कधीच नव्हतो...कारण, आज एक घटना घडली आहे. ज्या घटनेमुळे फक्त शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य मराठी माणूस सध्या अस्वस्थ झाला आहे... आता तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू की घात झाला… दिघेसाहेब घात झाला… आणि हो, तोदेखील आपल्याच लोकांकडून… म्हणूनच आज तुमची आठवण येतेय... 


शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब...
तेव्हा तुमची 56 इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही.. साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता... 
महाराष्ट्राने ज्या ठाण्याने  आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली. आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय...छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब...या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हे तुम्हीच बोलला होता ना साहेब? आज हे दुसऱ्यांदा झालंय...फक्त तुम्ही सोबत नाही. मग यांना माफ तरी कसं करायचं आम्ही...तुम्ही असता तर काय केलं असतं? म्हणून आज तुमची आठवण येतेयं...


आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं तुम्ही...आज काही जणांचं तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून जरा गहिवरून येतंय साहेब...तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होत आहेत... पण रडायचं नाही, लढायचं...हा विचार पुढं घेऊन जाणारी संघटना आहे आपली...साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला...म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब...


पण साहेब काळजी नसावी...कोणत्याही पदापेक्षा पिंवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना, पक्ष महत्त्वाचा आहे. तुमची हीच शिकवण सोबत घेऊन आम्ही मानाने मिरवत पुढे जाऊ. साहेब काळजी नसावी. तुमचा राजन आणि सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी...कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्यासोबत...साहेब...आम्ही जिवाची बाजी लावू पण पण ‘शिवसेनेचे ठाणे…ठाण्याची शिवसेना... हे ब्रीद कदापि पुसू देणार नाही आम्ही...


पुन्हा एकदा शिवसैनिक या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे...कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे आमच्या...


पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या.... आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा...