ठाणेठाण्यात पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT)  कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. ठाण्यात ठिकठिकाणी सध्या शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने 'होऊ दे चर्चा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. 


सध्या ठाण्यात ठाकरे गटातर्फे ठिकठिकाणी 'होऊ दे चर्चा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात चौकाचौकांत ठाकरे गटाचे कार्यकर्ते चौकसभा घेत सरकारवर निशाणा साधत आहेत.  ठाण्यातील हाजुरीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते येताच स्थानिक नागरिक आणि शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. यात स्थानिक कार्यकर्त्यांचा भरणा अधिक होता. हाजुरीत राजकीय वातावरणात बिघडवू नका असे म्हणत या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. मात्र, ठाकरे गटाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. तेव्हा दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही गटात वाद वाढत आहे, असे लक्षात येताच वेळीच पोलिसानी त्यात हस्तक्षेप केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना हाजुरीत कार्यक्रम न करण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथून गेल्यानंतर तणाव निवळला. 


स्थानिक रहिवासी, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही ठाकरे गटाला हा कार्यक्रम हाजुरीत करू नका. पर्यायी जागा देण्यात आली. त्या ठिकाणी "होऊ दे चर्चा"  या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोन्ही गटाला शांततेचे मार्गाने बाजूला करण्यात आले  असल्याचे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितलं. दरम्यान, सध्या तरी वाद तात्काळ मिटला असून परिस्थिती सामान्य असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. 


शिंदे-ठाकरे गट आमनेसामने 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. शिवसेनेचे जवळपास सगळेच नगरसेवक स्थानिक पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत गेले. तर, ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि त्यांची पत्नी नगरसेविका नंदिनी विचारे या उद्धव ठाकरे यांच्यासोबत यांच्यासोबत राहिले. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे हे देखील पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून ठाकरे यांच्यासोबत आहे. ठाण्यात दोन्ही गटांमध्ये विविध मुद्यांवरून वाद सुरू आहे. ठाण्यातील इतर तालुक्यातही याचे पडसाद उमटले होते.