Rajan Vichare : ठाणे शहारत अनेक भागात खड्डे पडले असून कोपरी पुलावर ही खड्याचे साम्राज्य पसरले आहे, पण पहाटे सहा वाजेपर्यंत काम करत असलेल्या ठाणेकर मुख्यमंत्र्याना शहरातील खड्डे दिसत नाहीत का ? असा सवाल उध्दव गटातील खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारत शिंदेंवर निशाणा साधला आहे. ठाणे शहारत पडलेल्या खड्यामुळे सामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून मुंबई प्रवेशद्वार जवळ असलेल्या कोपरी पुलावर काही दिवसापूर्वी खड्यामुळे एकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे कोपरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी कोपरी पुलाचा पाहणी दौरा केला. दरम्यान या पाहणी दौऱ्यात रेल्वेचे मुख्य प्रकल्प अभियंता लक्ष्मण लोलगे, एम एम आर डी ए चे प्रकल्प अभियंता सुर्वे, ठाणे महानगरपालिकेचे अभियंता धनंजय मोदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वेर्णेकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी आणि संध्याकाळी कोपरी रेल्वे पुलाच्या अरुंद मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीमुळे होणारा खोळांबा टाळण्यासाठी या पूलाचे रुंदीकरणाचे काम एम एम आर डी ए मार्फत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका तयार होऊन 9 ऑक्टोंबर 2021 रोजी याचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन नागरिकांसाठी खुला केला गेला. पण दुसऱ्या टप्प्यातील 4 मार्गिका सुरू करण्यासाठी जुना रेल्वे पुल तोडण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस भराव भरण्याचे काम तत्काळ सुरु करा, असे विचारे यांनी एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना बजावले. तसेच काही दिवसापूर्वी या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विनीत भालेराव या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित त्यांनी केला. ही बाब अतिशय गंभीर असून या तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयास कोणत्याही मदतीचा हात किंवा विचारपूस प्रशासनाकडून न मिळाल्याची खंत खासदार विचारे यांनी व्यक्त केली. त्या तरुणाच्या कुटुंबियांस नोकरी किंवा आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. तसेच शहारातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच शहरांतून इतर राज्यात जाणाऱ्या महामार्गावर देखील खड्डे पडलेले असल्याचे दिसून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करत आहेत? शिंदे सहा वाजेपर्यत काम करतात मग त्यांना खड्डे का दिसत नाहीत? नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयन्त करावेत असा चिमटा विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला.