ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) साकेत पुलावरील बेरिंग नादुरुस्त असल्यामुळे या पुलावरुन जड वाहनांची वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे बेरिंग दुरुस्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या नादुरुस्त बेरिंगमुळे डेक्स स्लॅबमध्ये  अतिरिक्त  व्हायब्रेशन निर्माण झाले आहेत. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली असून त्या संदर्भात परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे गुजरातकडून जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना माजीवाडा येथे सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे. दरम्यान या वाहनांना रात्री 11 ते सकाळी 5 दरम्यान  मुंब्रा बायपास मार्गे  वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 


'हे' आहेत पर्यायी मार्ग


वाहतूक विभागाकडून या मार्गावरुन वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ही वाहतूक घोडबंदर रोडद्वारे वळवण्यात आली आहे. ही वाहतूक माजीवाडा जंक्शन येथून आनंदनगर चेक नाक्याकडे वळवण्यात आली आहे. तिथून ही वाहने दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान ऐरोली, रबाळे आणि तुर्भेच्या दिशेने मार्गस्थ होतील. तर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांकरिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरुन येणाऱ्या वाहनांकरिता माजीवाडा येथे 24 तासांकरिता प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच, गुजरातकडून जेएनपीटीकडे आणि नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांकरिता देखील माजीवाडा येथे प्रवेश नाकारण्यात आला आहे. 


मुंबईकडून आनंदनगर टोलनाका मुलुंड मार्गे ठाण्यावरुन नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना आनंदनगर टोलनाका येथे 24 तास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांसाठी पर्याय मार्ग म्हणून मुलुंड ,ऐरोली मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. नाशिककडे जाण्यासाठी या ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे महापे, शेळीपाटा, मुंब्रा बायपास, खारेगाव टोलनाका मार्गे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत आणि दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


ही वाहतूक महामार्गावरील साकेत पुलाच्या स्पॅनमधील बेरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अमलात राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या दुरुस्तीमुळे या मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे. कारण बेरिंग नादुरुस्त असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. जी हे काम पूर्ण झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Thane News : साकेत ब्रिजमुळे ठाणेकर पुन्हा वेठीस, पुढचे आठ दिवस ठाणे शहरात वाहतूक कोंडी