ठाणे : कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा इथून पुढे फेरीवाल्यांना नाही तर फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना ठोकू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी दिला. परप्रांतीय फेरीवाले आणि मराठी तरुण वाद प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. 


मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी फेरीवाल्यांवर कारवाईबाबत महापालिकेला पत्र पाठवले, तसेच ही कारवाई सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.


अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा 


कल्याण स्काय वॉकवर मराठी तरुणाला परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगलंच झोडपलं. या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. शेकडो मनसे कार्यकर्ते मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पोलिस ठाण्यात जमा झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची मनसे आमदार राजू पाटील आणि शिष्टमंडळाने भेट घेतली. 


कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केला, कायदेशीर कारवाई केली त्याबद्दल आम्ही आलो नाही पण अनधिकृत फेरीवाल्याविरोधात पण कायदेशीर कारवाई करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. तसेच स्टेशन परिसरातील गर्दुल्ल्यांवर देखील कारवाई करा अशी सूचना दिली.  पोलिसांनी दबावापोटी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला. 


MNS Raju Patil On Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता टीका


खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाव न घेता राजू पाटील यांच्यावर टीका केली होती या टीकेला आज त्यांनी प्रत्युत्तर दिले. काही लोकांना पॉकेटमनी मिळावा म्हणून घरच्याच खात्यातून कामे दिलीत असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता केला. ते म्हणाले की, कुठलंही काम छोटं नसतं. गल्लीतलं काम केलं तरी ते जनतेसाठी असतं आणि तुम्ही बिल्डरांसाठी रस्ते बनवले ते जनतेचा सोयीसाठीच आहेत. कालच्या बोलण्यातून माज दिसत होता तो उतरण्यासाठी ट्विट केलं.


MNS Raju Patil On KDMC : केडीएमसी नव्हे तर केडी'यम'सी


इथे जीवन पण सुसह्य नाही आणि मरण पण सुसह्य नाही अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. ते म्हणाले की, ज्यांनी 25 वर्ष सत्ता भोगली, त्यांनी काही केलं नाही. आपल्या नावापुढे डॉक्टर लावणारे इकडचे खासदार आहेत, आयुक्त आहेत. मात्र त्यांना आरोग्य सुविधांची जाण नाही. लोकांना स्वस्तात आरोग्य सुविधा मिळू शकतात. मात्र तसं न करता जागा पदरात पाडायची आणि त्यातून लोकांना सोयी सुविधा देतोय असे भासवायचे हेच प्रकार सुरू आहेत. मुंबईत कोव्हिड घोटाळा झाला, कल्याण डोंबिवलीतही झाला. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांना त्यांच्या लबाडी उघड होऊ नये म्हणून धमक्या देऊन पक्षात प्रवेश दिला. इथे बदल केल्याशिवाय पर्याय नाही.


ही बातमी वाचा: