ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall Thane) काल प्रेक्षक हर हर महादेव (Har Har Mahadev) सिनेमा पाहण्यासाठी आले. मात्र या प्रेक्षकांना पॉलिटिकल पिक्चर पाहायला मिळाला.  विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठलं आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करून दाखवा असं थेट आव्हान आव्हाडांना दिलं. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.  फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून   गुन्हा दाखल करण्यात आला आहे


संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव सिनेमावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही या वादात उडी घेतली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये प्रंचड हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. मात्र या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. 


चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असल्याचं सांगत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमची इच्छा काय आहे हे त्यांना कळलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेतल्याचं दाखवलंय ते तसं नाही, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंदर्भात जे दाखवलं ते इतिहासाला धरुन नाही. अक्षय कुमारला आमचा विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया 16 ते 46 वयाच्या दरम्यानच्या होत्या. अक्षय कुमारचं सध्याचं वय काय आहे, तो दाखवू शकणार आहे का? शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात विकृती का दाखवली जात आहे. शिवाजी महाराजांचा आदर बाजीप्रभू देशपांडे करायचे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


'वेडात मराठे वीर दौडले सात' आणि 'हर हर महादेव' या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट विभागाने देखील जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाच्या विकृतीकरणाचे विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट विभागाने घेतली आहे. यासोबतच केंद्रसरकार व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळातील सदस्यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.