Jitendra Awhad controversy : ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश आहेर यांच्यावरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. जितेंद्र आव्हाड वादात अडकलेत, हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. जिंतेंद्र आव्हाड आणि वाद, हे जुनं समीकरण आहे..पाहूयात आतापर्यंत जितेंद्र आव्हाड कोणत्या कोणत्या कारणामुळे वादात अडकले होते. 


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आव्हाड चर्चेत आले होते. पुरंदरे यांनी लिहीलेला इतिहास चुकीचा आहे आणि तो ब्राह्मण्यवादाकडे झुकणारा आहे असा आक्षेप आव्हाडांनी घेतला होता. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोकाचा विरोध हे देखील आव्हाड यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य ठरले.


मंत्रिपद आले तरीही ते इतर कारणांमुळे सतत वादात राहिले. आव्हाड यांचे आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांना त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण गाजले होते. मंत्रीपदाच्या काळातच या प्रकरणी आव्हाड यांना अटक झाली होती.


‘हर हर महादेव’ या सिनेमालाही आव्हाड यांचा हाच आक्षेप होता. बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेवर दाखविल्या गेलेल्या प्रसंगांना आव्हाड यांनी विरोध केला होता. या चित्रपटाचा व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला खेळ आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला होता. या आंदोलनादरम्यान एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याने ते वादात सापडले होते.
 
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या केतकी चितळे आणि अजून काही तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याने जो वाद झाला त्यात देखील आव्हाडांचं नाव चर्चेत आले होते. 


नोव्हेंबर 2022 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथे पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आव्हाडांवर एका महिलेने थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर देखील आव्हाड यांना अटक आणि नंतर सुटका करण्यात आली. कोर्टाने त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना जामीनावर मुक्त केले होते.
 
औरंगजेब हा पूर्ण होता अशा आशयाचे विधान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. तो वाद शांत होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वीच शिवाजी महाराज गोट्या खेळत होते का? अफजल खान शाहिस्तेखान नसता तर शिवाजी महाराजांचा इतिहास कळला असता का ? अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा त्यांनी वाद ओढवून घेतला होता. हा वाद शांत होतो तोपर्यंतच महेश आहेर यांना मारहाण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं नाव पुन्हा चर्चेत आले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 


आव्हाड आणि महेश आहेर यांच्यातला वाद नेमका कसा सुरू झाला ?


14 फेब्रुवारीला जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये महेश आहेर यांचा उल्लेख करत, एका माणसाला महेश आहेर रात्री साडेदहा वाजता कॉल करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. त्याचबरोबर पालिकेच्या अखत्यारीतले अनेक म्हाडाचे फ्लॅट्स आहेर यांनी परस्पर विकून टाकले, हा एक मोठा घोटाळा आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका कधी चौकशी करणार महेश आहेर याला का वाचवण्यात येत आहे, असे प्रश्न ट्वीट मधून आव्हाड यांनी केला.  


त्यानंतर बुधवारी महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली. या क्लिपमध्ये बाबाजी म्हणजेच सुभाष सिंग ठाकूर यांचे नाव घेत आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला टार्गेट करणार असल्याचे तसेच मी दिवसाला चाळीस लाख रुपये कमवतो आणि त्यातले अर्धे बाबाजीला देतो असे संभाषण समोर आले.  हे संभाषण करणारा महेश आहेर असल्याचा दावा आव्हाड यांनी केला.  


त्यानंतर बुधवारी संध्याकाळी ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारात जाऊन महेश आहेर यांना मारहाण केली, तिथून या वादाला वेगळे वळण मिळाले.