ST Workers :  आपल्या मागण्यांसाठी एखादी व्यक्ती विविध मार्ग अवलंबते. मात्र, पदरी सतत निराशा येत असेल तर त्या व्यक्ती काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना भिवंडी एसटी आगारात (Bhiwandi ST Protest) घडली. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.  भिवंडी शहरातील बस डेपो येथील एसटी महामंडळाचा (MSRTC Bus Driver) चालक आत्महत्या करण्यासाठी 40 ते 50 वरील बॅनर होर्डिंगवर चढल्याने बस डेपोत एकच खळबळ उडाली. आनंद बाबासाहेब रणदिवे (वय 45) असे या एसटी महामंडळ बस चालकाचे नाव आहे. वरिष्ठांकडून सुरू असलेल्या जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलले असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. अखेर वरिष्ठांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच हा कर्मचारी 50 फूट उंच असलेल्या होर्डिंगवरून खाली उतरला. 


एसटी कर्मचारी रणदिवे यांनी सांगितले की, एसटी महामंडळ भिवंडी आगाराच्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यासाठी बॅनर होर्डिंगवर रणदिवे चढले होते. भिवंडी ते ठाणे या बसच्या तीन फेरी आणि आठ तास ड्युटी करावी अशी अपेक्षा आहे. परंतु अधिकारी चार फेरी व बारा तास ड्युटी करून घेतात. त्यांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.


आनंद रणदिवे यांनी आज जाचाविरोधात 'आरपार की लढाई' करण्याच्या निश्चयाने आगारात आले. आगाराच्या आवारातील 40 ते 50 फूट उंच बॅनर होर्डिंगवर रणदिवे चढले. त्यांच्या या निर्णयाने परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच घटनास्थळी एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच निजामपूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. रणदिवे यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, रणदिवे हे आठ तास ड्युटी आणि तीन बस फेऱ्या करण्याच्या लेखी आश्वासनावर ठाम होते. एसटीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना समजवण्याचे प्रयत्न सुरू होते. लेखी आश्वासनावर ठाम असून त्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.


अखेर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. रणदिवे यांच्या मागणीबाबत लेखी पत्र तयार केले आणि त्यानंतर ते वाचून दाखवण्यात आलं. या पत्राबाबत खात्री पटल्यानंतर रणदिवे यांनी आपला हट्ट सोडून होर्डिंग बॅनरवरून खाली उतरले. 


का घेतला टोकाचा निर्णय?


आपल्या या निर्णयाबाबत सांगताना रणदिवे यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. एसटी चालकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होतो. एसीमध्ये बसलेले अधिकारी यांना वाहतूक कोंडीची काही माहिती नसते. त्यामुळे वाहन चालवताना काय त्रास सहन करावा लागतो, हे आम्हालाच ठाऊक असल्याचे त्यांनी म्हटले. एसटी बसच्या तीन फेऱ्या आणि आठ तास ड्युटी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. परंतु एसटी महामंडळाच्या नियमानुसार चार फेऱ्या व आठ तास ड्युटी असे असताना काही वेळ वाया गेल्याने ड्युटी बारा तासाची होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 


दरम्यान, संपूर्ण प्रकरणात निजामपूर पोलिसांनी रणदिवे यांना ताब्यात घेतला आहे आणि पुढील चौकशी पोलीस करत आहे.