कल्याण: महापालिकेच्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर महिला प्रसूती प्रकरणानंतरही केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार सुरुच असल्याचं दिसून येत आहे. कल्याण (Kalyan) जवळच्या टिटवाळा (Titwala) येथील केडीएमसीच्या रुग्णालयातील ओपीडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. याविरोधात आता शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.


टिटवाळा पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद, शिवसेना आक्रमक 


चार लाख लोकसंख्या असलेल्या टिटवाळ्यातील पालिका रुग्णलयाची ओपीडी बंद झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. केडीएमसीच्या आरोग्य विभागाची अनास्था समोर आली असून महापालिका रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयाचं साटंलोटं असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय देशेकर यांनी केला आहे. तर आज ओपीडी सुरू झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देशेकर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.


रुग्णालयाच्या दारात प्रसूती प्रकरणानंतर विविध पक्षांचा रोष


महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात देखील आरोग्य सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत, याची बोंब नेहमीच नागरिकांकडून केली जाते. पालिका रुग्णालयात योग्य प्रकारे सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून वारंवार केली जात आहे. टिटवाळा रुग्णालयात देखील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग हा अपुरा आहे, त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नाही. त्याचा प्रत्यय नुकताच घडलेल्या महिला प्रसूती प्रकरणातून समोर आला आहे.


केडीएमसीच्या आरोग्य खात्याच्या खुलासा


प्रसूती घटनेनंतर सोमवारी  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एक खुलासा करण्यात आला. त्या खुलाशानुसार, या प्रकरणात डॉक्टर आणि स्टाफ यांची काहीच चूक नव्हती. या संदर्भात दिलेल्या बातम्यांची वस्तू स्थिती वेगळी असल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र या प्रकरणावर खुलाशाच्या दोन तासांनंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन खुलाशाच्या उलट प्रतिक्रिया दिली आहे.


पालिका आयुक्तांनी काढला चौकशीचा तोडगा


पालिका रुग्णालयाच्या खुलाशावर, घडलेली घटना अत्यंत चुकीचं असल्याचं पालिका आयुक्तांनी म्हटलं. डॉक्टरांकडून गैरवर्तन झालं असेल तर त्याची सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चौकशी केली जाईल, असं म्हटलं.


ऐन वेळी केडीएमसीच्या रुग्णवाहिकांमध्येही बिघाड


हे सर्व प्रकरण सुरू असताना आरोग्य सेवेची दुसरी समस्या आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह शवविच्छदेनासाठी जेजेला पाठवला जात होता. पोलीस आणि मुलीचे नातेवाईक त्या मुलीचा मृतदेह घेऊन जेजे रुग्णलायात निघणार होते, तेव्हा रुग्णवाहिका सुरु होत नव्हती. रुग्णवाहिकेचं ऑईल लिकेज होतं. पोलिसांनी केडीएमसीला सूचित करुन दुसरी रुग्णवाहिका मागवली, यावरुन रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याचंही या घटनेतून उघड झालं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kalyan: कल्याणमध्ये रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती; मनसे आमदार राजू पाटील भडकले