Continues below advertisement

ठाणे : राज्यात ज्या महापालिकेतील फोडाफोडीमुळे महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मिठाचा खडा पडतोय अशी शक्यता होती त्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजली जाणारी ही महापालिका म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं होमग्राऊंड. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी जोर लावण्यात येतोय.

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे नगरसेवक, नेते फोडण्याची मालिकाच शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये सुरू होती. ती आता थांबल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंचे प्राबल्य असलेल्या या महापालिकेत भाजपनेही मोठी तयारी केली आहे. हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवतील असं चित्र आहे. मात्र जर वेगवेगळे लढले तर या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण होईल. त्याचसोबत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेही या ठिकाणी युतीतून लढणार आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Continues below advertisement

Kalyan Dombivli Election : निवडणूक एकतर्फी होणार का?

कल्याण डोंबिवली महापालिकेत 1995 सालापासून 2020 पर्यंत शिवसेना भाजपची सत्ता आहे. मधली अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. शिवसेनेच्या फुटीनंतर आता महायुतीतील शिंदे सेना आणि भाजपने महायुतीत निवडणूका लढविण्याचे संकेत दिल्याने महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडून तेवढ्या ताकदीने उत्तर दिले जात नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदें सेना एकत्र लढले तर सामना एकतर्फीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदेसेना आणि भाजपकडून महापौर हा महायुतीचा बसणार असा दावा केला जात आहे. महापालिका निवडणकीच्या आधीच शिंदे सेना आणि भाजपने एकमेकांच्या पक्षाती मातब्बर माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यातून त्यांनी त्यांचे पॅनल सुरक्षित केले. ज्यावेळी एकमेकांचे नेते फोडले जात होते त्यावेळी दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात होता. मात्र आता महायुतीतून निवडणूक लढण्याचे संकेत मिळाल्यानंतर स्वबळाचा नारा मागे पडल्याचं चित्र आहे. मात्र, त्यामुळे एकमेकांच्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांची मात्र चांगलीच गोची झाल्याचं दिसतंय.

Kalyan Dombivli Municipal Corporation : राजकीय समीकरण काय?

महायुतीत शिंदे सेना आणि भाजप एकत्रित लढणार असले तरी महायुतीमधील तिसरा पक्ष, अजित पवाराची राष्ट्रवादी महायुतीत नसेल असे वरिष्ठांनी स्पष्ट केल आहे. स्थानिक पातळीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदे सेनेबरोबर महायुतीत निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, मनसे आणि उद्धव सेना यांच्यात युती होणार हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मात्र अद्याप काहीच ठरल्याचं दिसत नाही.

KDMC Election Politics : कोणते मुद्दे ठरतील निर्णायक ?

1. महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. सीसीटीव्ही, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करुन उड्डाणपूल, रस्ते विकसीत केले जात असले तरी काही प्रकल्प प्रगतीपथावर असल्याने वाहतूक कोंडीतून तोपर्यंत सुटका नाही.

2. महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. 27 गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. सध्या तरी महापालिकेच्या क्षेत्रात पाण्याची समस्या आहे.

3. शहरात घनकचरा व्यवसथापनाचा प्रश्न गंभीर आहे. तीन प्रभाग सोडता अन्य प्रभागात कचरा खाजगीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी रुग्णालय कागदावर आहे.

Kalyan Dombivli News : प्रशासकीय राज संपणार

महापालिकेची यापूर्वीची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. तिचा पंचवार्षिक कालावधी 2020 मध्ये संपूष्टात आला. त्यावेळी कोरोना महामारी होती. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक पार पडली नाही. त्यामुळे 2020 पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. होऊ घातलेल्या निवडणकीमुळे प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.

एकूण वॉर्ड - 31

चार सदस्यांचे वॉर्ड- 29

तीन सदस्याचे वॉर्ड- 2

एकूण सदस्य संख्या- 122

KDMC Election : महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल कसं?

शिवसेना (एकत्रित) - 53

भाजप- 43

काँग्रेस -4

राष्ट्रवादी-2

मनसे- 9

बसपा- 1

एमआयएम- 1

अपक्ष- 9

एकूण मतदार - 14,24,748

पुरुष - 7,45,470

महिला-6,78,726

इतर- 552

वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला?

गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी 1 लाख 74 हजार 102 मतदार वाढले आहेत. या वाढलेल्या मतदानाचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.