Continues below advertisement

ठाणे : डोंबिवलीत 2.5 लाख रंगेबिरंगी पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची एक अफलातून मोझॅक चित्रनिर्मिती (Bharat Mata Mosaic Artwork) सध्या अतिशय लक्षवेधक ठरत आहे. रंगीत पणत्यांच्या माध्यमातून आकारलेल्या चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती तयार करण्यात आली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक कलाकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक डोंबिवली जिमखाना मैदानावर गर्दी करत आहेत.

डोंबिवली म्हणजे मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचं माहेरघर असलेलं शहर. त्या शहरात भारतमातेची भव्य मोझॅक कलाकृती निर्माण करण्यात आल्याने ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

Continues below advertisement

या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, भारतमातेचे पूजन हे संस्कार बालपणातून झालेले असल्याने आणि त्या भारतमातेचे गुणगान गाणारे व वंदन करणारे राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम. अशा श्रद्धा व आस्थेच्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डोंबिवलीत जागतिक विक्रम करण्याचा डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने निर्णय घेतला. चेतन राऊत तसेच प्रभू कापसे व वैभव कापसे या पितापुत्रांच्या जोडीने आणि अन्य कलाकार-साथीदारांनी मिळून सतत नऊ दिवस खपून पणत्या रंगवून कलात्मकतेचा अविष्कार सादर केल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी काढले.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, भारतमाता आपल्यासाठी देवी स्वरूप आहे. म्हणून तिचं सनातन संस्कृतीत आपण पूजन करतो. आपण सर्वजण त्याच धरतीची लेकरं आहोत आणि या मातीतूनच तयार केलेल्या पणत्यांनी मोझॅक साकारण्याची कल्पना सूचली आणि भारतमातेला, वंदे मातरम गीताला अनोखी मानवंदना देण्याचे ठरले. 95 फूट उंची आणि 75 फूट रुंदीची, सुमारे अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा (दिव्यांचा) वापर करून साकारलेली भारतमातेची अद्भुत मोझॅक कलाकृती निर्माण करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम यशस्वीपणे प्रस्थापित झालेला आहे.

ही भव्य कलाकृती कलाकार चेतन राऊत, वैभव प्रभू कापसे तसेच डोंबिवलीकर आर्टिस्ट टीम यांनी अवघ्या नऊ दिवसांत साकारली. डोंबिवली जिमखानातर्फे उत्सव या नावाने वार्षिक मेळा आयोजित केला जातो. तिथे ही कलाकृती 28 डिसेंबर पर्यंत खुली ठेवण्यात आली असून प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केले.

ही बातमी वाचा: