Kalyan-Dombivli News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan Dombivli Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्तांनी लेट लतिफ कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना तसंच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसंच वर्तवणूक सुधारली नाही तर कारवाई केली जाईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्तांनी दिला.


केडीएमसी (KDMC) कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणे दहा वाजता हजेरी लावणे अपेक्षित आहे. मात्र कोरोना काळापासून बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने केडीएमसी कर्मचारी, अधिकारी तासभर उशिराने कार्यालयात येत होते. त्यामुळे कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरिकांना तासभर ताटकळत उभं राहावं लागत होतं. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. अखेर आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सकाळीच प्रवेशद्वारावर उभं राहत येणाऱ्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. शिवाय त्यांना खडेबोल सुनावत कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.


शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची वेळ सकाळी पावणेदहा ते पावणेसहा असताना कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मात्र सारं काही अलबेल सुरु असल्याचे दिसून येत होतं. कोरोना काळात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली, त्यानंतर ती आजतागायत सुरु झालेले नाही. बंद असलेली ही बायोमेट्रिक हजेरी लेट लतिफ कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मात्र पथ्यावर पडल्याचे दिसून येत होतं. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणेदहा वाजता कार्यालयात हजेरी लावून अपेक्षित असताना हे कर्मचारी तास-दीड तास उशिराने आपल्या कार्यालयात येत होतं. त्यामुळे आपल्या विविध कामांसाठी पालिकेत येणाऱ्या नागरिकांना मात्र या अधिकाऱ्यांची वाट बघत तास दीड तास ताटकळत उभं राहावं लागत होतं. याबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या अखेर या तक्रारीची दखल महापालिका आयुक्तांनी घेतली. 


आज (10 ऑक्टोबर) सकाळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिका मुख्यालय गाठलं. पालिकेचे प्रवेशद्वारावर उभे राहून उशिराने येणाऱ्या या कर्मचारी, अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. धक्कादायक म्हणजे या उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंत्यासह, मुख्य लेखा अधिकारी देखील होते. याबाबत अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. इथून पुढे जर वर्तणूक अशीच राहिली तर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.


इतर संबंधित बातम्या