Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली महापालिकेचा (Kalyan Dombivli Municipal Corporation) सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव संबंधित विभागाने तयार केले. हे दोन्ही रस्ते डांबरी व सुस्थितीत असताना या रस्त्यांच्या काँक्रिटकरणाचे साडे सात कोटींचे पाच प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवले. मात्र महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) संशय आल्याने हे सर्व प्रस्ताव रोखून धरले. इतकेच नव्हे तर आयुक्तांनी 15 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावत लक्ष्मण दिवेकर या शिपायाला निलंबित केले आहे.


गेल्या आठवड्यात या आदेशाच्या फाईल्स गायब झाल्याने हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र मधील आठ दिवस या फाईल कुठे गायब झाल्या होत्या? संबंधित अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्त कारवाई करणार का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


15 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस


कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील डांबरी रस्ते सुस्थितीत असताना, या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे साडे सात कोटी खर्चाचे पाच प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अपरोक्ष तयार केले. या प्रस्तावांमध्ये गडबड असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले आणि हे सर्व प्रस्ताव आयुक्तांनी रोखून धरले. कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील सुस्थितीत असलेले डांबरीकरणाचे रस्ते काँक्रीटीकरणाचे करण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. हे प्रस्ताव शहर अभियंता विभागाकडून आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले. शहरातील बहुतांशी रस्ते सुस्थितीत आहेत. रस्ते कामांसाठी बेताचा निधी, दायित्व नसताना फडके, म्हसोबा मैदान भागातील रस्त्यांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने का तयार केले. या प्रस्तावांच्या फाईलमध्ये अर्थसंकल्पीय खर्च तरतूद, दायित्व नोंदीची टिपणे नव्हती. आयुक्तांच्या मनात संशय आल्याने त्यांनी हे प्रस्ताव तयार करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी 15 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. 


या कार्यवाहीसाठी आयुक्तांच्या दालनातून रस्ते कामाच्या फाईल सामान्य प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या दालनात पाठवण्यात आल्या. साहाय्यक आयुक्त करचे यांनी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पाच अभियंत्यांना नोटिसची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करुन फाईल सामान्य प्रशासन अधीक्षक, उपायुक्त यांच्याकडे पाठवणे आवश्यक होते. करचे यांच्या दालनातून गतिमानतेने या फाईल वरिष्ठांकडे गेल्या नाहीत. आयुक्तांनी अभियंत्याना देण्यात येणाऱ्या नोटीसबाबत सामान्य प्रशासन विभागात विचारणा केली. तेव्हा अशाप्रकारे नोटीस देण्यात आल्या नाहीत. ती फाईल सामान्य प्रशासन विभागात आली नसल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. या फाईल साहाय्यक आयुक्त करचे यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत, असे आयुक्त कार्यालयाने सांगितले. करचे यांनी आपण शिपायांच्या माध्यमातून फाईल पुढे पाठवल्याची भूमिका घेतली. त्यात आयुक्तांना तथ्य आढळले नाही.


गठ्ठ्यात 'हरवलेल्या' फाईल आढळल्या


महत्त्वाच्या फाईल गायब झाल्याने आयुक्तांनी पोलीस तक्रार करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आयुक्त कार्यालय ते साहाय्यक आयुक्त कार्यालय दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांचा शिपाई लक्ष्मण दिवेकर हा त्या महत्त्वाच्या फाईल बाहेर घेऊन जाऊन संबंधित ठेकेदाराच्या 'खास इसमा'च्या हातात देत असल्याचे दिसले. करचे यांच्या दालनातून फाईल बाहेर गेल्याचे आणि त्यांनी याविषयी संशयास्पद भूमिका घेतल्याने आयुक्तांनी करचे यांना फैलावर घेतले. त्यानंतर शोधाशोध केल्यावर शिपाई दिवेकर यांनी बांधलेल्या गठ्ठ्यात 'हरविलेल्या' फाईल आढळून आल्या. या फाईल कोठून आल्या याची आपणास माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिवेकर यांनी दिले. आयुक्तांनी दिवेकर यांना तात्काळ निलंबित केले. बांधकाम विभागाच्या पाच अभियंताना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 


करचे यांच्या बेजबाबदारपणामुळे शिपाई नाहक निलंबित झाला, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. करचे यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांचा फोन उचलला नाही. या संपूर्ण प्रकरणावरती शिपाई लक्ष्मण दिवेकर यांच्याशी संपर्क साधला असता दिवेकर यांनी या प्रकरणात माझी काही चूक नसल्याचे सांगत माझ्यावर अन्याय झाला आहे असे फोनवरुन माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले


हेही वाचा


KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, दोन मृत व्यक्तींसह आठ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या