ठाणे : कल्याणमधील चिकणीपाडामध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचं आणि फरशा बसवण्याचं काम सुरू होतं. त्यातूनच स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडल्याचं समोर आली. या दुर्घटनेत तिथे काम करणारा एक गवंडी मात्र वाचला. दुपारच्या जेवणासाठी तो इमारतीबाहेर गेला आणि इकडे इमारत पत्त्यासारखी कोसळली. जितेंद्र गुप्ता असं या गवंड्याचं नाव आहे. 

Kalyan Building Slab Collapsed : मिस्त्री जेऊन झोपला अन् मृत्यूने गाठले

कल्याण पूर्व चिकणीपाडा येथील सुमारे चाळीस वर्षे जुन्या असलेल्या सप्तशृंगी इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावर फरशी बसवण्याचं आणि कोबा करण्याचं काम सुरू होतं. जितेंद्र गुप्ता आणि व्यंकट चव्हाण हे चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचे काम करत होते. सोमवारी हे काम सुरू होतं. मंगळवारी दुपारपर्यंत काम केल्यानंतर जितेंद्र गुप्ता हा जेवण्यासाठी बाहेर गेला. तर त्याचा मित्र व्यंकट चव्हाण हा त्याच ठिकाणी जेवला आणि झोपला. 

बाहेर जेवणासाठी गेलेला जितेंद्र गुप्ता हा जेव्हा परत आला त्यावेळी त्याला इमारत कोसळल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याचा मोठा धक्का बसला. कारण आतमध्ये त्याचा मित्र व्यंकट चव्हाण हा झोपेतच मृत्यूमुखी पडला होता. इमारत कोसळल्यानंतर झालेल्या ढिगाऱ्याखाली अडकून व्यंकट चव्हाणचा मृत्यू झाला होता. 

Kalyan Building Collapsed : स्लॅब कोसळून सहा जण ठार

कल्याण पूर्व चिकणीपाडा येथील सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. पत्त्यांप्रमाणे चौथा माळ्यावरील स्लॅब हा तळमजल्यापर्यत कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दलाने व केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. पण त्यामध्ये सहा जणाचा मृत्यू झाला होता. 

सप्तशृंगी इमारत धोकादायक यादीत नव्हती

सप्तशृंगी इमारत ही धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. या इमारतीचे डागडुजी करण्याचे काम सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर चौथ्या मजल्यावर कोबा करण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. 

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा स्थितीतही धोकादायक जाहीर केलेल्या इमारतींमधून लोक बाहेर पडत नसल्याने महापालिकेसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. 

ही बातमी वाचा: