ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत सात मजल्याची इमारत उभारली होती. याप्रकरणी तक्रार येताच केडीएमसी (KDMC) महापालिकेने या संबधित विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली. पोलीस बंदोबस्तात आज ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मोठ्या जेसीबी यंत्रणासह अग्निशन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही इमारत जमिनदोस्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जमिनीच्या 7/12 उताऱ्याव वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) आणि आनंदराज आंबेडकर यांचे नाव आहे. त्यामुळे, येथील रिपल्बिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी केडीएमसी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार, आज पाडकामाला सुरुवात झाली आहे. 

डोंबिवलीजवळ असलेल्या दावडी येथे सेंट जॉन शाळेसमोरी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली होती. या जमिनीच्या 7/12 वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी दोन नावे आहेत. दरम्यान, आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याना देत याप्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली होती. मागील अडीच वर्षापासून नवसागरे याप्रकरणी पाठपुरावा केला होता, या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडले होते, त्यानंतर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचे काम पूर्ण केले. मात्र, नवसागरे यांच्याकडून तक्रारींचा व कारवाईचा मागणी करण्यासंदर्भातील पाठपुरावा सुरूच होता.   

यादरम्यान पालिका प्रशासनाच्यावतीने विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली असून संबधित प्रकरणी पोलिसांनी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, आज या इमारतीवर पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू करण्यात आली. आता, लवकरच ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले. 

हेही वाचा

मोठी बातमी! राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच...; मंत्रि‍पदाची शपथ घेताच छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल